एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची कारवाई फडणवीसांच्याच काळातीलः टोपे

0
72
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबतची कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्याच काळात सुरू झाली, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मागील सरकारच्याच काळात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नेमणूक केली होती.

 एमएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यावर टोपे यांनी खुलासा केला आहे.  राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रिगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या मंत्रिगटाने शिफारस केली होती. ही कार्यवाही गेल्या वेळेसच्या शासन काळातच सुरू झाली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती मला गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती. मी तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित आहे, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा