प्रा. राजन शिंदे खून प्रकरणाचे गूढः पिक्चर तयार, रिलिज होणेच बाकी!

0
1102
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या खूनाला रविवारी आठ दिवस झाले. या आठ दिवसांत तांत्रिक आणि भावनिक पद्धतीने तपास करून पोलिस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले. प्रा. शिंदे यांचा खून कसा आणि का केला? खून केल्यानंतर खूनाची दिशा बदलण्यासाठी आरोपीने कोणत्या क्लृप्त्या केल्या. याची सर्व माहिती पोलिसांनी सूसूत्रपणे जोडली आहे. त्याचे पुरावे, कागदोपत्री जबाब नोंदवले आहेत. पूर्ण पिक्चर तयार झाली आहे. फक्त ती रिलिज होणे बाकी आहे. त्यासाठी विहिरीतून शस्त्र बाहेर काढण्याचाच अवकाश आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

प्रा. राजन शिंदे यांच्या खूनाने राज्यातील शैक्षणिक जगत हादरून गेले आहे. प्रा. शिंदे यांचा खून कुणी आणि का केला? हे शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी तपासाच्या विविध पद्धतींचा अवलंब करून मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

प्रा. शिंदे यांचा खून त्यांच्याच एका निकटवर्तीयाने प्रचंड द्वेषातून केला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रा. शिंदे हे त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकाचा नेहमीच ‘ढ’ म्हणून पाणउतारा करायचे. वारंवार होत असलेल्या या अपमानामुळे प्रा. शिंदे यांच्या निकटवर्तीयाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. त्यामुळे या दोघांमध्ये फारसे संभाषणही होत नव्हते. १० ऑक्टोबर रोजी रात्रीही या दोघांमध्ये असाच टोकाचा वाद झाला. रात्री दीडवाजेपर्यंत हा वाद सुरू होता. त्यानंतर मध्यरात्री प्रा. शिंदे हे बैठकीच्या खोलीत झोपी गेले. हीच संधी साधून निकटवर्तीयाने त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासातच पोलिस या निष्कर्षाप्रत पोहोचले होते. मात्र त्यांच्या हाती ठोस पुरावे नव्हते. चौकशीतही निकटवर्तीयांकडून मागमूस लागू दिला जात नव्हता. त्यामुळे प्रा. शिंदे यांच्या खूनाचे गूढ उकलणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते.

 गाढ झोपेत असलेल्या प्रा. शिंदे यांच्या डोक्यात मुख्य आरोपीने डंबेल्स मारले. त्यातच शिंदे यांचा मृत्यू झाला. पण ते जिवंत असल्याची भीती वाटल्यामुळे  मारेकऱ्याने चाकू, कटरने त्यांचा गळा, हाताच्या नसा आणि कान कापला. प्रा. शिंदे यांच्या हत्येनंतर आसपासचे आणि आपल्या अंगावरील रक्त मारेकऱ्याने टॉवेलने पुसले होते. डंबेल्स, रक्ताने माखलेला चाकू, कटर आणि टॉवेल सिडको एन-७ येथील विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ही शस्त्रे हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी विहिरीचे पाणी उपसण्यात आले. शनिवारी मध्यरात्री पाऊस झाल्यामुळे विहिरीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळे ही शस्त्रे हस्तगत करण्यासाठी पोलिसांना विलंब झाला. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत. विहिरीतून शस्त्रे बाहेर काढल्यानंतर मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. या खूनाच्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा पोलिस पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा