पुणेः पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. न्या. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.
न्या. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला होता. मुंबई विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते १९८९ ते १९९५ या काळात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
सेवानिवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यक्रमात सक्रीय होते. अनेक मुद्यांवर त्यांनी आग्रहाने आपली भूमिकाही मांडली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्थापन झालेल्या समन्वय समितीचे ते काही काळ अध्यक्षही होते. परंतु मतभेदांमुळे त्यांनी ही जबाबदारी सोडली होती. निवडणूक बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी कार्यकर्ते संसदेत असावेत, असे न्या. सावंत यांचे आग्रही मत होते.
सर्वच क्षेत्रात आदर्श माणूसः न्या. सावंत यांच्या निधनाबद्दल माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचे ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर त्यांनी जे निर्णय दिले, त्यामुळे संसदेत कायदे करावे लागले होते. माणसाने माणसाशी कसे वागावे, याचे ते उत्तम उदाहरण होते, असे न्या. कोळसे पाटील म्हणाले.