पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर गर्दीस प्रतिबंधः मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

0
37

औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गर्दीला प्रतिबंध घाला, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी प्रशासनाला आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूकविषयक पूर्व तयारीचा आढावा बलदेव सिंह यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाययोजना सज्ज ठेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडाव, असे निर्देशही त्यांनी दिले.

 यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी. जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना आदींसह विभागातील सर्व पोलीस अधीक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनूसार सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडा. प्रामुख्याने सर्व मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूरक व्यवस्था ठेवत सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य पथक सज्ज ठेवा, सर्व केंद्रावर सॅनिटायजर, गर्दीस प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना सिंग यांनी दिल्या.

सर्व मतदारांना सॅनिटायजर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश द्यावा, सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे, मतदान, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, नियमबाह्य गोष्टी घडणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. आक्षेपार्ह काही घडल्यास अशा प्रकारच्या घटनेची तातडीने आयोगास माहिती द्यावी. नकारात्मक गोष्टी प्रसारित होणार नाही, मतदारांत संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी घडणार नाही, यासाठी यंत्रणांनी खबरदारी घेण्याचे निर्देश सिंह यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा