नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभर उद्रेकाचे वातावरण, ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर!

0
51
छायाचित्र सौजन्य: एनडीटीव्ही

नवी दिल्लीः नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून संपूर्ण देशभरातच उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून या कायद्याचा विरोध करत आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही शहरांत मोबाइल इंटरनेट, एसएमस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद करण्यात आली आहे. बेंगळुरू, दिल्लीमध्ये सरकारने जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

 नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आज काँग्रेस आणि अन्य भाजपविरोधी पक्षांनी मोर्चे आणि निदर्शनांचे आयोजन केले आहे. देशभरातील तरूणाईचा लक्षणीय सहभाग हे या कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे वैशिष्ट्ये आहे. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारे हे विधेयक भारतीय स्वातंत्र्याचे धर्मनिरपेक्ष लोकशाही असे असलेले स्वरुप नष्ट करण्यासाठीच मोदी सरकारने नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणल्याचा आंदोलनकर्त्यांचा आक्षेप आहे.

 मुंबई, मालेगावात मुस्लिम संघटनांचा मोर्चाः नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मुंबई आणि मालेगावात मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सायंकाळी चार वाजता मुंबईतील ऑगस्टक्रांती मैदानावर या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह महत्वाच्या सेलिब्रेटीही सहभागी होणार आहेत.

इतिहासकार रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यातः बेंगळुरूमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना कर्नाटक पोलिसांनी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवणारे फलक दाखवत असताना पोलिसांनी त्यांचे हात खेचले आणि ओढतच ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतले. ही पोलिसांची दडपशाही असल्याचे सांगत देशभरातील आंदोलनकर्त्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. दिल्लीत योगेंद्र यादव, विमलेंदू झा, डी. राजा, सीताराम येचुरी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण: लखनौ, पाटण्यातही या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून लखनौमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. उत्तर प्रदेशातील संभल येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकनकर्त्यांनी येथे जाळपोळ, दगडफेक केली आणि एका बसला आग लावली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर प्रदेशात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

छायाचित्र सौजन्य: स्वराज इंडिया आंदोलन

 हा देशातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्नः प्रियंका गांधी

मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. दिल्लीत आज कोणालाही आवाज उठवण्याची परवानगी नाही. परंतु तुम्ही कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तितक्याच मोठ्या प्रतिकाराने आवाज आणखीच बुलंद होईल, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा