जिना प्रेमी परतले, त्यांना आणखी एक फाळणी हवीः ऑगस्टक्रांती मैदानावर CAA विरोधात विराट एल्गार

0
156

मुंबई: मोदी सरकारने केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा आहे. भारतात धर्माच्या आधारे नागरिकत्व का? असा खडा सवाल करत मुंबईच्या ऑगस्टक्रांती मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या संविधानप्रेमी नागरिक, कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींनी मोदी सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरूणाई सहभागी झाली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईच्या ऑगस्टक्रांती मैदानावर विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अनेक सेलिब्रिटींनी ट्विटवरून केले होते. त्याला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने  संविधानप्रेमी नागरिक, तरूणाई, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटींचे लोंढे ऑगस्टक्रांती मैदानावर जमा झाले.या आंदोलनात तरुणाई आणि महिला वर्गाचा मोठा समावेश होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, भीम आर्मी, सीपीआयसह छात्र भारती आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सर्वांच्या हातात निषेधाचे फलक आणि झेंडे होते. यावेळी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी रद्द करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण दक्षिण मुंबईतील मोबाइल इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली होती आणि ऑगस्टक्रांती मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आवाज उठवणे हा माझा अधिकार- फरहानः कोणत्याही गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणे हा मला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. जनता आता आवाज उठवत आहे आणि त्यांना मी पाठिंबा देत आहे. सध्या जे काही चालले आहे, त्यात कुठे ना कुठे पक्षपात झालेला आहे, असे चित्रपट अभिनेता फरहान अख्तर म्हणाला.

जिना प्रेमी परत आले आहेत- स्वरा भास्कर: हा गांधींचा भारत आहे. हा भगतसिंगांचा भारत आहे. भयानक भारत मला काही दिवसांपूर्वीच दिसत होता. 1947 मध्ये महम्मद अली जिना नावाच्या माणसाने धर्म आणि नागरिकत्वाच्या आधारे देशाचे विभाजन होते होते. आता जिना प्रेमी परत आले आहेत. भारताच्या एका फाळणीने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना आणखी एक फाळणी हवी आहे, अशी घणाघाती टीका अभिनेत्री स्वरा भास्करने मोदी सरकावर केली.

अहिंसा मार्गाने जाऊ या-जावेद जाफरीः नागरिकत्व दुरुस्ती कायदा अत्यंत धोकादायक आहे. हे सरकार रोजीरोटीवर बोलण्याऐवजी राम मंदिरावर बोलते. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर आपण आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे अभिनेता जावेद जाफरी म्हणाला. 

फाळणीसाठी कायदा- तिस्ता सेटलवाडः देशात आधी दंगली घडवण्यात आल्या. नंतर झुंडबळी घेण्यात आले. आता देशाची फाळणी करण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणण्यात आला आहे, अशी टीका प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा