फडणवीस, नाक घासून माफी मागाः महाराष्ट्राची मागणी; वंशज म्हणाले, ‘आम्हाला शिकवू नका’

2
774
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थोर क्रांतिकारी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांना ‘सामाजिक कार्यकर्ते’ असे संबोधल्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली असून जाणीवपूर्वक केलेल्या या चुकीबद्दल छत्रपती शाहू स्मारकावर नाक घासून माफी मागा, या मागणीने जोर धरला आहे. फडणवीस यांच्या जे पोटात आहे, तेच यानिमित्ताने ओठात आल्याची टीकाही अनेकांनी केली असून छत्रपतींच्या वंशजांनी मात्र या एकूणच वादात फडणवीसांबद्दल चकार शब्दही न काढणेच पसंत केले आहे.

काल, ६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिन होता. त्यानिमित्त शाहू महाराजांना ट्विट करून आदरांजली वाहताना फडणवीस यांनी ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा शाहू महाराजांचा उल्लेख केला होता. त्यावरून टिकेची झोड उठल्यानंतर फडणवीसांनी हे ट्विट डिलिट करून टाकले. मात्र ट्विट डिलिट करून महाराष्ट्रातील जनतेचे समाधान झालेले नाही. फडणवीसांनी छत्रपती शाहू स्मारकावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अशी मागणी असंख्य लोकांकडून केली जात आहे.

फडणवीसजी, तुमचे पूर्वज शाहू महाराजांकडे कार्यकर्ते म्हणून झाडू मारायला होते, हे विसरू नका. जाणीवपूर्वक केलेल्या या चुकीची छत्रपती शाहू स्मारकावर नाक घासून माफी मागा. नाही तर तुमचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्र ट्रोल करतोय म्हणून परत निवेदन सादर करायला जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

कायम आकसः या मुद्यावरून काँग्रेसने फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखणे आश्चर्यकारक नाही. संघाने मनुवाद आणायचा असल्याने महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकसच केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!’, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

ही जुनीच खोडः राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही ही विशिष्ट वर्गाची जुनीच खोड असल्याचे म्हटले आहे. ‘बहुजन समाजातील महापुरूषांची बदनामी करणं ही येथील एका विशिष्ट वर्गाची जुनीच खोड आहे. समस्त भारतीयांसाठी आदर्श असणाऱ्या लोकराजे राजर्षि शाहू महाराज यांना त्यांच्या स्मृतीदिनी फडणवीस यांनी ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणणे हा आमच्या राजांचा अपमान आहे’,अशी टीका त्यांनी केली. हे मुद्दाम केले आहे की नजरचुकीने हे त्यांनाच माहिती. परंतु या कृत्यासाठी फडणवीसांनी समस्त महाराष्ट्राची माफी मागायला हवी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

वंशज गप्प का?: अनेक नेटकऱ्यांनी याच मुद्यावरून छत्रपतींचे वंशज युवराज संभाजीराजे यांनाही जाब विचारला आहे. ‘खासदार युवराज संभाजी, यांना आम्ही डोक्यावर घेतले. त्यांचा उदो उदो केला. त्यांनी आमच्या चळवळीला वाऱ्यावर सोडले. नंतर भाजपचे खासदार झाले. दुःख नाही वाटलं. व्यक्तिगत प्रगती केली. ठिक आहे. पण आज शाहू महाराज यांना फडणवीस हे कार्यकर्ते म्हणतात व त्यांचे वंशज गप्प राहतात याचे दुःख वाटते,’ असे सामाजिक कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी म्हटले आहे.

मी काय केलेे पाहिजे हे शिकवू नकाः संभाजी छत्रपतींनीही फडणवीसांचा उल्लेख टाळलाः दरम्यान, छत्रपतींचे वंशज संभाजी छत्रपती यांनी या प्रकरणावर आज मौन सोडले मात्र फडणवीसांकडून माफीची मागणी केली नाही. छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केले पाहिजे, हे मला शिकवण्याची गरज नाही. छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादे प्रकरण समोर आले तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडले होते. मग इतरांचे काय घेऊन बसलात?  असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे. पण त्यांनी या स्पष्टीकरणात फडणवीसांचा साधा उल्लेखही केला नाही किंवा त्यांनी माफी मागवी, अशी मागणीही केली नाही.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा