गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का निवडला?, राजकीय पक्षांना प्रसिद्ध करावे लागणार कारण!

0
91
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः निवडणुकीतील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सर्वंकष माहिती वेबसाइट आणि स्थानिक वृत्तपत्रांमार्फत जनतेसाठी प्रसिद्ध करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वच राजकीय पक्षांना दिला. या प्रसिद्धी बरोबरच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का निवडला? याचे कारणही जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राजकीय पक्षांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे.

निवडणुकीतील उमेदवारांवर दाखल असलेले गुन्हे, खटले आणि ते खटले सुनावणीच्या कोणत्या टप्प्यांवर आहेत, याची माहिती पक्षाच्या वेबसाइटवर आणि स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याबरोबरच अशा उमेदवाराच्या निवडी मागचे नेमके कारण काय? हेही प्रसिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राजकीय पक्षांना बजावले आहे. उमेदवाराची निवड केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या उमेदवाराचा सविस्तर तपशील तीन दिवसांच्या आत सादर करा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने अशा उमेदवाराची माहिती निवडणूक आयोग किंवा त्यांच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर केली नाही तर निवडणूक आयोग न्यायालयाच्या बेअदबीची प्रक्रिया सुरू करते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले अर्ध्याहून अधिक आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दिल्लीतील आमदारांची संख्या दुप्पट झाली आहे. दिल्ली विधानसभेतील ७० आमदारांपैकी २०१५ मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले २४ आमदार होते. २०२० मध्ये त्यांची संख्या ४३ वर गेली आहे. त्यापैकी बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न केल्याचे आरोप असलेले तब्बल ३७ आमदार आहेत.

गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांपासून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे, ही चिंताजनक बाब आहे, असे न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा