सव्वादोनशे कोटींच्या बँक डेटा चोरीत भाजप चित्रपट आघाडीचे नेते मंकणींचा मुलगा गजाआड

0
182
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

पुणेः डोमरंट म्हणजे निष्क्रिय बँक खातेदारांची गोपनीय माहिती चोरून सव्वा दोनशे कोटी रुपये हडपण्याच्या प्रयत्नात पुण्याच्या सायबर गुन्हे पोलिसांनी अटक केलेल्या नऊ जणांमध्ये भाजप चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष आणि अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचाही समावेश आहे.

आयसीआयसीआय, एचडीएफसीसारख्या नामांकित बँकांच्या डोमरंट खात्यांची गोपनीय माहिती मिळवून त्या खात्यातील रकमेचा अपहार करणारी आंतरराज्य टोळी पुणे पोलिसांनी पकडली. या टोळीमध्ये  रविंद्र महादेव माशाळकर (वय ३४), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४), मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय ३७), राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४), रोहन रवींद्र मंकणी (वय ३७), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२), परमजित सिंग संधू (वय ४२) आणि अनघा अनील मोडक (वय ४०) या आरोपींचा समावेश आहे. यातील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे एएम न्यूज या वृत्तवाहिनीशी संबंधित आहेत.

यापैकी रविंद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरूण वर्मा हे चौघे बँक खात्यांचा गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कटामध्ये या कंपनीमधील अन्य व्यक्ती सहभागी आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.

निष्क्रिय बँक खात्यांचा गोपनीय डेटा औरंगाबाद येथील एका बड्या व्यक्तीला पैसे घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांची मध्यस्थ अनघा मोडक होती. २५ लाख रुपये घेऊन  २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा ते विक्री करणार होते. अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला रोहन रविंद्र मंकणी या अभिनेते आणि भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रविंद्र मंकणी यांचा मुलगा आहे. ३७ वर्षीय रोहन मंकणी पुण्यातील सहकारनगरमध्ये राहतो. रविंद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बाप माणूस अशा मालिका गाजल्या आहेत. निवडूंग, स्मृतीचित्रे अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा