निष्क्रिय बँक खात्यातून २ अब्ज १६ कोटी हडप करताना एएम न्यूजचे राजेश शर्मा, संधू गजाआड

0
2578
छायाचित्र सौजन्यः फेसबुक

पुणेः बँकेच्या  डोरमंट अकाउंट म्हणजेच निष्क्रिय बँक खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळवून त्यातील अब्जावधी रुपये लाटण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पर्दाफाश केला असून या प्रकरणी पोलिसांनी  एएम न्यूजचे राजेश मुन्नालाल शर्मा आणि  परमजितसिंग संधू यांच्यासह दहा आरोपींची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

 पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहा आरोपींमध्ये रविंद्र महादेव माशाळकर (वय ३४), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४), मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय ३७), राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४), रोहन रवींद्र मंकणी (वय ३७), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२), परमजित सिंग संधू (वय ४२) आणि अनघा अनील मोडक (वय ४०) या आरोपींचा समावेश आहे.  पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या फिर्यादीवरून या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करून आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर बँकातील डोरमंट अकाउंटची (निष्क्रिय खाती) माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. या बँक खात्यात जमा असलेले २ अब्ज १६  कोटी २९ लाख रुपये अकाउंट हॅक करून त्यांच्या बँक खात्यात वळणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यापूर्वी पोलिसांना याचा सुगावा लागल्याने त्यांनी त्यांचा हा प्लॅन हाणून पाडला.

हे सर्व आरोपी सिंहगड रस्त्यावरील सन सिटी येथील संपायला सोसायटीत आरोपी भटेवरा यांच्या घरी एकत्र जमले असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी छापा मारून तब्बल २५ लाख रुपये रोख ४३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये दोन वाहनांचाही समावेश आहे. सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा