पुण्यात घुमणार पुन्हा एल्गार! ३० जानेवारीला एल्गार परिषदेच्या आयोजनास परवानगी

0
152
संग्रहित छायाचित्र.

पुणेः पुण्यात पुन्हा एकदा एल्गार घुमणार आहे. पुणे पोलिसांनी येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषद भरवण्यास परवानगी दिली आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी या आधी २१ डिसेंबरला एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती, ती नाकारण्यात आली होती.

एल्गार परिषद भरवण्यासाठी न्या. कोळसे पाटील यांनी पुण्याच्या स्वारगेट पोलिस ठाण्यात अर्ज करून परवानगी मागितली होती. परंतु कोरोना संकटाचे कारण सांगत पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. त्यानंतर जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारली तर रस्त्यावर परिषद भरवू, असा इशारा न्या. कोळसे पाटील यांनी दिला होता.

पुण्याच्या शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेली एल्गार परिषद वादाचा विषय ठरली होती. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी भीमा- कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचा संबंध पोलिसांनी थेट या एल्गार परिषदेशी जोडला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार राज्यात सत्तेत होते.

शनिवारवाड्याच्या एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या अनेक विचारवंतांवर अर्बन नक्षली असल्याचे गुन्हे दाखल करत त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. ते अजूनही तुरूंगात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता ३१ जानेवारी रोजी एल्गार परिषद भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेत केवळ २०० लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा