पुणेः ३१ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भीमा कोरेगाव शौर्यदिनी १ जानेवारीला विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्याच्या आदल्याशिवाय म्हणजे ३१ डिसेंबरला पुण्यात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पुण्याच्या स्वारगेट पोलिसांकडे परवानगीसाठी रितसर अर्जही केला होता.
यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भीमा कोरेगाव विजयीस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. एल्गार परिषदेमुळेच हा हिंसाचार झाल्याचा ठपका तत्कालीन भाजप सरकारने ठेवला होता. या परिषदेत माओवादी सहभागी झाले होते, असाही आरोप करण्यात आला होता. २०१७ च्या एल्गार परिषद प्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
यंदाची एल्गार परिषद भरवण्यासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या पुढाकाराने निवृत्त शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. ही परिषद गणे कला क्रीडा मंच येथे घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. त्यासाठीची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता.
जातीयवाद, दडपशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढणारे वक्ते या एल्गार परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही आयोजकांनी दिला होता. आता पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आयोजक न्यायालयात जातील तेव्हा न्यायालय या परिषदेला परवानगी देईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.