पुणे विद्यापीठानेही उघड केली प्रा. तोटावाड यांची बनवाबनवी, एसटीचे जातप्रमाणपत्र आणले समोर

0
255
संग्रहित छायाचित्र.

पुणे/ औरंगाबादः एसटी प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र सादर करून सेट परीक्षा उतीर्ण केलेले आणि ओबीसी प्रवर्गातून विवेकानंद कला व सरदार दलिपसिंग महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक बनलेले प्रा. नागनाथ रामराव तोटावाड हे अडचणीत सापडत चालले असून त्यांची नियुक्ती रद्दबातल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता सेट परीक्षा घेणाऱ्या पुणे विद्यापीठानेच प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी सेट परीक्षेला अर्ज सादर करताना दाखल केलेल्या एसटी प्रवर्गाच्या जातप्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह त्यांनी एसटी प्रवर्गातूनच सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि विवेकानंदच्या प्राचार्यांना कळवले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचनाही केली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.

२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापक पद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.

हेही वाचाः फसवाफसवीः सेट परीक्षा उत्तीर्ण एसटी प्रवर्गातून, प्राध्यापकाची नोकरी मिळवली ओबीसी प्रवर्गातून

प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले.

छातीठोकपणे केला होता खुल्या प्रवर्गाचा दावाः प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड हे एसटी प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले असताना त्यांना ओबीसी प्रवर्गातून प्राध्यापकपदी नियुक्ती देण्यात आलीच कशी? असा आक्षेप घेत रिपाइंचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर न्यूजटाऊनने प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांच्याशी संपर्क साधला असता आपण खुल्या प्रवर्गातूनत सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून आपल्या जातीचा नंतर ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्याचा दावा केला होता. आपले सगळे क्लिअर असून आपल्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असेही प्रा. तोटावाड यांनी छातीठोकपणे सांगितले होते. मात्र प्रा. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाच्या सहायक कुलसचिवांनी २ डिसेंबर २०२१ रोजी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रामुळे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांचा दावा खोटा असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

गांभीर्य विद्यापीठाला कसे कळत नाही?:  पुणे विदयापीठाच्या सेट परीक्षा विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि विवेकानंदच्या प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रासोबत प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी सेट परीक्षेचा अर्ज भरताना सादर केलेल्या एसटी प्रवर्गातील जातप्रमाणपत्राची सत्यप्रतही जोडली आहे आणि प्रा. डॉ. तोटावाड यांच्या सेट परीक्षा उत्तीर्णचा तपशीलही जोडला आहे. प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून त्यांच्यावर आपल्या पातळीवर उचीत कारवाई करावी, असेही पुणे विद्यापीठाने या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचाः फसवाफसवीः प्रा. नागनाथ तोटावाड यांची नियुक्ती धोक्यात, विद्यापीठाने मागवला तातडीने अहवाल

तातडीच्या अहवालाचे काय झाले?:  प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी फसवाफसवी करून ओबीसी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सहायक प्राध्यापकाची नोकरी मिळवल्याची तक्रार झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी २९ नोव्हेंबर रोजी विवेकानंदच्या प्राचार्यांना पत्र लिहून तीन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यापाठोपाठ उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनीही ३० नोव्हेंबर रोजी प्राचार्यांना पत्र लिहून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या दोन्ही उच्च पदास्थांच्या ‘तातडीच्या निर्देशा’ला आता आठवडा उलटून गेला तरी अद्याप कोणतीही ‘तातडी’ची कारवाई  झाली नसल्यामुळे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा