निवडणूक २०२२: पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर पराभूत, अमरिंदर आणि सिद्धूही हारले!

0
215

चंदीगडः पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसने कल्पनाही केली नसेल असे निकाल हाती आले आहेत. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींना त्यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही पराभूत झाले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसला २० जागा तरी मिळतील की नाही, असे सध्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेसविरुद्ध बंड करून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भदौरमध्ये आम आदमी पार्टीचे लाभसिंग उगोके यांना ५७ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत तर चन्नी यांना २३ हजारांहून जास्त मते मिळाली आहेत. चमकौर साहिबमध्ये चन्नी यांना ५० हजार मते मिळाली तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आपचे उमेदवार चरणजीतसिंग यांना ५४ हजार मते मिळाली आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. ते अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे त्यांच्या पटियाला शहर विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. आपचे अजीतपालसिंग कोहली यांनी त्यांचा पराभव केला. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या कॅप्टन अमरिंदर यांच्या पराभवातून पंजाबमध्ये कॅप्टनच्या सत्तेविरोधात जनमानस होते, याचे संकेत मिळतात, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी पक्ष सोडण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेतृत्वाने आपला तीनवेळा अपमान केला, आता यापुढे सहन करू शकत नाही, असे म्हटले होते. काँग्रेसने त्यांचे प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांना पाठबळ द्यायला सुरूवात केल्यानंतर कॅप्टननी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणारे आणि भाजपसोबत युती करून ही निवडणूक लढवणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री ७९ वर्षीय अमरिंदरसिंग यांनी एक ट्विट करत पराभव मान्य केला आहे. लोकशाहीचा विजय झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आम आदमी पार्टी आणि भगवंतसिंग मान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी नम्रतेने जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. लोकशाहीचा विजय झाला आहे. पंजाबी लोकांनी जातीयवाद आणि जातीय धृव्रीकरणाच्या पलीकडे जाऊन मतदान करून खरी पंजाबियतची भावना दाखवून दिली आहे. आप आणि भगवंत मान यांना शुभेच्छा,’ असे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकार स्थापनेची तयारी करत आहे. पंजाबमध्ये आपला प्रचंड मोठी आघाडी मिळाली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी म्हणजेच आपला पहिल्यांदाच एक पूर्ण राज्य चालविण्याची पहिली संधी आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. येथे आपचे सरकार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा