लसीचेही राजकारणः ‘पाण्याइतक्या सुरक्षित’ कोव्हॅक्सीनच्या परिणामकारकतेवर तज्ज्ञांना शंका

0
73
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने मंजुरी दिल्यावरून निर्माण झालेला वाद आणखीच वाढत चालला आहे. फायझर, माडर्ना आणि ऑक्सफर्डच्या लसी वगळता अन्य लसी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशा शब्दांत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी टिकास्त्र सोडले असतानाच कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत सहभागी झालेल्या तज्ज्ञांकडेच कोणताही डेटा नाही. अनेक ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यात पहिलाच डोज देण्यात आला असून दुसरा डोज दिला जात आहे. त्यामुळे कोणत्या प्रक्रियेअंतर्गत कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी म्हणजेच डीसीजीआयने रविवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. डीसीजीआयच्या मंजुरीनंतर शशी थरूर, आनंद शर्मा आणि जयराम रमेश यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या आकडेवारीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता वैज्ञानिक क्षेत्रातील लोकही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.

कोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांशी संबंधित असलेले गोव्याच्या रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. धनंजय लाड हे डीसीजीआयच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. ‘डीसीजीआयने सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारावर रातोरात निर्णय घेतला, याचे मला आश्चर्य वाटते. डीसीजीआय एसईसीने सूचवलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करते. त्याला काही दिवस लागतात. ही आदर्श पद्धत आहे,’ असे डॉ. लाड म्हणाले. कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून सुरू आहेत आणि त्याचा प्रभाव कसा राहील, हे आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतरच कळेल, असेही डॉ. लाड म्हणाले.

भारताखेरीज केवळ रशिया आणि चीनने एफिकेसी डेटा सार्वजनिक न करताच आपापल्या लसींना मंजुरी दिली आहे. ज्या पद्धतीने ही मंजुरी देण्यात आली आहे, त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही आणि ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग करण्यात आला आहे, ते रचनात्मक लेखन वाटते, कायदेशीर आधार नव्हे, असे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोइथिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. अनंत भान यांनी म्हटले आहे.

भारत बायोटेकची भूमिकाः परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नसताना स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीला मंजुरी दिल्यामुळे तज्ज्ञांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि विरोधी पक्षांकडून टीका केली जात असतानाच भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यावरील टीका अनाठायी आहे. मला एक आठवडा द्या, मी तुम्हाला निश्चित आकडेवारी देतो. आमच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परिणामकारकतेची आकडेवारी मार्चपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, असे डॉ. इल्ला यांनी म्हटले आहे.

मोदींकडून मात्र तोंडभर कौतुकः दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र स्वदेशी कोव्हॅक्सीने तोंडभरून कौतुक करत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की, ज्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे, त्या दोन्ही मेड इन इंडिया आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या वैज्ञानिक समुदायाच्या इच्छाशक्तीचे ते प्रतीक आहे. तो आत्मनिर्भर भारत, ज्याचा आधार आहे- सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, असे ट्विट प्रधानमंत्री मोदींनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा