राफेल विमाने खरेदीतील घोटाळा दडपला, भारतीय दलाला दिली ८ कोटींची लाचः मीडिया पार्टचा दावा

0
92
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

नवी दिल्लीः भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या राफेल लढाऊ विमाने खरेदी करारात झालेला भ्रष्टाचार दडपण्यात आला असून राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या डसॉल्ट कंपनीने हा करार पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय दलाला तब्बल एक दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय रुपयांत आजच्या मूल्यानुसार ८ कोटी ६ लाख २१ रुपयांची मोठी रक्कम ‘भेट’ दिल्याचा दावा ‘मीडिया पार्ट’ या फ्रेंच माध्यमाने केला आहे. या दाव्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ या राणा भीमदेवी गर्जनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून हा करार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

‘सेल ऑफ फ्रेंच राफेल जेट फायटर्स टू इंडियाः हाऊ अ स्टेट स्कण्डल वॉज बरीड’ या शिर्षकाखाली ‘मीडिया पार्ट’ने वृत्त प्रकाशित केले आहे. २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या ७.८ दशलक्ष युरो किंमतीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. २३ सप्टेंबर २०१६ रोजी फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यवेस ले ड्रियन आणि भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी डसॉल्ट एव्हिएशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रेपियर यांच्या उपस्थितीत राफेल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ७.८ दशलक्ष युरोचा हा करार पश्चिम आफ्रिकेतील बेनीन या देशाच्या वार्षिक जीडीपीच्या रकमेएवढा आहे.

भारताशी २०१६ मध्ये हा करार झाल्यानंतर डसॉल्ट कंपनीने भारतातील मध्यस्थाला १ दशलक्ष युरो एवढी मोठी रक्कम ‘भेट’ देण्याचे मान्य केले आणि २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ही रक्कम ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ट्रान्सफर करण्यात आली, असा दावा मीडिया पार्टने केला आहे.

फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी संस्था एजन्सी फ्रॅन्सेइस अँटीकरप्शन म्हणजेच एएफएने डसॉल्ट कंपनीचे नियमित लेखापरीक्षण केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. लेखापरीक्षणात ही धक्कादायक बाब आढळून आल्यानंतरही एएफएने प्रॉसिक्युशन अधिकाऱ्यांना या रकमेबाबत सचेत न करण्याचा निर्णय घेतला. अडसॉल्ट कंपनीने ज्या भारतीय मध्यस्थाला कोट्यवधींची ही रक्कम भेट दिली, तो भारतीय मध्यस्थ अन्य एका संरक्षण खरेदी करारात भारतीय तपास संस्थांच्या रडारवर आहे.

एएफएच्या लेखापरीक्षणात एवढी मोठी रक्कम ‘गिफ्ट टू क्लाएंट’नावाने ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर डसॉल्ट कंपनीने ही रक्कम राफेल लढाऊ विमानांचे ५० मोठे मॉडेल्स विकसित करण्यात आल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कोणत्याही राफेल विमानांची निर्मितीच करण्यात आली नव्हती, असा दावा मीडिया पार्टने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा