काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा राहुल गांधींकडेच?, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी

0
40
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला नेतृत्वाचा पेच या पार्श्वभूमीवर आज झालेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी अनेक नेत्यांनी लावून धरली. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे बैठकीच्या अखेरीस राहुल गांधी म्हणाले आणि बैठकीत टाळ्यांचा कडकडाट झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राहुल यांच्याकडेच पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता बळावली आहे.

काँग्रेसचा नवीन पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेचा भाग म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला ज्येष्ठ नेत्यांसोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत नेत्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या.

 काँग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आजपासून सुरू केलेली ही चर्चा आणि बैठका पुढील १० दिवस चालणार आहे. सोनिया गांधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

 आजची बैठक सुमारे पाच तास चालली. या बैठकीत राहुल गांधी यांनाच पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करावे, अशी मागणी अनेक नेत्यांनी केली. राहुल गांधी यांनीही पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. याच बैठकीत पक्षाची पुढील रणनीती आणि पक्ष बळकट करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, ते नेतेही या बैठकीला उपस्थित होते. या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्यांवरही या २३ नेत्यांपैकी पाच-सहा नेते सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा