भाजपमध्ये घमासानः राजस्थानात वसुंधरा राजे समर्थकांची नवी संघटना, पक्षश्रेष्ठींना इशारा

0
768
संग्रहित छायाचित्र.

जयपूरः राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा घमासान होण्यासारखी परिस्थिती आहे. यावेळचा घमासान काँग्रेसमध्ये नव्हे तर भाजपमध्ये होईल. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांच्या समर्थकांनी वसुंधरा राजे समर्थक मंचाची स्थापना केली आहे. या मंचाच्या स्थापनेवर राज्यातील अन्य भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ताठ कण्याने उभा राहू शकेल असा राजस्थानच्या राजकाराणातील एकमेवर नेता म्हणून वसुंधरा राजे यांचे नाव घेतले जाते. मोदी आणि शाह यांनी वसुंधरा राजेंना शह देण्यासाठी मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना वसुंधरा राजेंचा पर्यायी नेता म्हणून उभा करण्याचा प्रयत्न केला, मात्र वसुंधरा राजे यांच्यासारखी राजकीय प्रतिमा कोणालाही निर्माण करता येऊ शकली नाही.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि विरोधी पक्ष उपनते राजेंद्र राठौर या तिघांनी एकत्रित मिळूनही वसुंधरा राजेंचा सामना करण्यात अपयश आले आहे. यावरूनच राजस्थानच्या राजकारणातील वसुंधरा राजे यांचा दबदबा स्पष्ट होतो.

२०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा असल्याचे राजे समर्थक मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वसुंधरा राजे समर्थक मंचच्या लेटरहेडवर वसुंधरा राजे यांच्याबरोबरच त्यांच्या आई विजया राजे शिंदे यांचेही छायाचित्र आहे.

वसुंधरा राजे यांनी राजस्थानात राबवलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा मंचाच्या स्थापनेचा हेतू असल्याचे वसुंधरा राजे समर्थक मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी म्हटले आहे. काँग्रेस सरकारने वसुंधरा राजे यांच्या काळातील अनेक योजनांची नावे बदलली आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला भक्कम करणे हा आमचा हेतू असल्याचेही विजय भारद्वाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राजस्थानच्या २५ जिल्ह्यांत वसुंधरा राजे समर्थक मंचाच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते आमदार-खासदारांचाही या मंचाला पाठिंबा असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपले आदर्श तर वसुंधरा राजे प्रेरणास्थान आहेत, असा दावाही भारद्वाज करतात. आम्ही जर वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात काम करू इच्छित असू तर त्यात चुकीचे काय? असा सवाल करतानाच आमची संघटना भाजपपेक्षा वेगळी नाही, असा दावाही ते करतात.

यावरून राजस्थान भाजपमध्ये आता घमासान सुरु झाले आहे. केंद्रीय नेतृत्वाला या मंचाच्या स्थापनेची माहिती आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर लोकांकडून बरेच काही व्हायरल केले जात आहे. परंतु ते सोशल मीडिया पुरतेच मर्यादित आहे. याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असेही पुनिया म्हणाले.

राजस्थानच्या राजकारणात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे हे एकमेकांना मदत करत असल्याची चर्चा नेहमीच होते. काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि गहलोत गटात घमासान सुरु झाल्यानंतर वसुंधरा राजे यांनी मौन धारण केल्यामुळे भाजपमध्ये चांगलेच वादंग माजले होते. तेव्हा भाजपच्या प्रदेश मुख्यालयात झालेल्या बैठकीलाही वसुंधरा राजे यांनी दांडी मारली होती आणि बऱ्याच दिवसांनंतर त्यांनी मौन सोडले होते.

वसुंधरा राजे यांचे केंद्रीय नेतृत्वाशीच नव्हे तर राज्यातील अनेक नेत्यांशी मतभेद आहेत. ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर वसुंधरा राजे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. भाजप आमदार मदन दिलावर आणि राजसमंदच्या खासदार दिया कुमारी यांना प्रदेश कार्यकारिणीत महामंत्री केल्याबद्दल राजेंनी नाराजी व्यक्त केली होती.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राजस्थानमधून वसुंधरा राजेंना हटवण्याच्या उद्देशाने त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले होते. मात्र वसुंधरा राजे राजस्थानच्या बाहेर पडल्याच नाहीत. पक्षश्रेष्ठींनी वसुंधरा राजे यांचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा धुडकावून लावत गुलाबचंद कटारिया यांना विरोधी पक्षनेतेपदी तर राजेंद्र राठौर यांना उपनेतेपदी बसवले.

या एकूणच नाराजीतून वसुंधरा राजे यांनी या मंचच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना स्पष्ट संदेश दिला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत आपणाला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केले नाही तर पक्षाला ते अवघड जाईल, हेच या मंचच्या माध्यमातून दाखवण्याचा वसुंधरा राजेंचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आता पक्षश्रेष्ठी या एकूणच प्रकरणाबद्दल काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा