टाटांनी जिंकली समस्त भारतीयांची मने!: म्हणाले, भारतरत्नपेक्षाही मी भारतीय आहे हेच मोठे भाग्य!

0
711
छायाचित्र सौजन्यः twitter

मुंबईः ‘भारताचे अनमोल रत्न’ म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी पुन्हा एकदा समस्त भारतीयांची मने जिंकली आहेत. रतन टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात यावे, अशी मोहीम सोशल मीडियावर चालवली जात आहे. ती थांबवण्याचे नम्र आवाहन करतानाच ‘तुमच्या भावनांचा आदर आहे परंतु भारतरत्नपेक्षाही मी भारतीय असल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो, कृपया ही मोहीम आता थांबवा,’ असे आवाहन टाटा यांनी नेटकऱ्यांना केले आहे.

परोपकारासाठी प्रसिद्ध असलेले मोटिवेशनल वक्त्ये डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात यावे, असे पहिल्यांदा ट्विट केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर #BharatRatnaForRatanTata आणि #RatanTata  हे दोन हॅशटॅग शुक्रवारी दिवसभर ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये राहिले. नेटकऱ्यांनी रतन टाटा यांनी केलेले सामाजिक कार्य आणि परोपकाराची असंख्य उदाहरणे देत नेटकऱ्यांनी त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. या मोहीमेवर खुद्द रतन टाटांनीच अतिशय नम्र शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

‘सोशल मीडियावर एका गटाने एका पुरस्काराबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. अशी मोहीम थांबवा, अशी मी नम्र विनंती करतो,’ असे ट्विट रतन टाटांनी केले आहे.

‘त्याऐवजी मी भारतीय असल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी भारताची प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान देण्याचा मी प्रयत्न करतो,’ असेही रतन टाटा यांनी म्हटले आहे.

रतन टाटा यांनी हे ट्विट केल्यानंतर #RatanTata हा हॅशटॅग पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आला. नेटकऱ्यांनी टाटांच्या या विनम्रतेचे तोंडभर कौतुक केले.  तुम्ही आधीपासूनच आमच्यासाठी भारतरत्न आहात, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टाटांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रतन टाटा हे समाजसेवेसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकदा घडले आहे. रतन टाटा हे त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रतीही अत्यंत संवेदनशील आहेत. कोणताही बडेजाव न करता त्यांनी मुंबईहून थेट पुणे गाठून आपल्या कर्मचाऱ्याचे घर गाठले आणि त्याची विचारपूस केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा