खरीखुरी अयोध्या नेपाळमध्येच, श्री रामही भारतीय नव्हेचः नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा दावा

0
340
संग्रहित छायाचित्र.

काठमांडूः खरीखुरी अयोध्या भारतामध्ये नव्हे तर नेपाळमध्येच आहे. प्रभू श्री रामही भारतीय नसून नेपाळीच होते, असा खळबळजनक दावा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी केला आहे.

नेपाळी कवी, अनुवादक आणि लेखक भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे. भारताने त्यांच्याकडे नकली अयोध्या निर्माण केली आहे. खरी अयोध्या तर नेपाळच्या बीरगंज येथील एका गावात आहे. खरी अयोध्या बीरगंजच्या पश्चिमेला असलेल्या थोरीजवळ आहे. मात्र भारत आपल्याकडेच भगवान रामचंद्राचे जन्मस्थळ असल्याचा दावा करतो, असे ओली म्हणाले.

ओली एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आणखीही काही दावे केले. दशरथाचे पुत्र राम भारतीय नव्हते आणि अयोध्याही नेपाळमध्येच आहे. आम्ही जनकपुरीमध्ये जन्मलेली सीता भारतीय राजकुमाराला दिली नव्हती, तर तिचा विवाह अयोध्येतील रामाशी झाला होता, भारतातील रामाशी नव्हे, असेही ओली म्हणाले.

सांस्कृतिकदृष्ट्या नेपाळची कायमच गळचेपी करण्यात आली आहे, असा दावाही ओली यांनी केला आहे. ओली यांच्या दाव्यानंतर आता भारत काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण सध्या भारतात केंद्रामध्ये ‘मंदिर वही बनाएंगे’ म्हणत अयोध्येतील राम मंदिरासाठी रथयात्रा काढणाऱ्या भाजपचेच सरकार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा