आरोग्य खात्याची नोकर भरतीः परीक्षेेवेळी सोबत ठेवा प्रवेशपत्राबरोबरच या सहापैकी एक ओळखपत्र!

0
204
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत माहिती दिली. उमेदवारांना आरोग्य विभागाने सांगितलेल्या सहापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवता येईल.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने गट ‘क’ संवर्गातील भरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी तर गट ‘ड’ करिता ३१ ऑक्टोबर  रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत डॉ. पाटील यांनी उमेदवारांना आवाहन केले आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

या सहापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवाः उमेदवारांनी प्रवेशपत्रावर आपले छायाचित्र चिकटवावे. त्यासोबतच पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, छायाचित्र असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, मूळ आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र म्हणून सोबत ठेवावे. सोबत निळ्या अथवा काळ्या शाईचा बॉलपेन घ्यावा. परीक्षेच्या वेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवेश पत्रावर नमूद वेळेपेक्षा एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य संचालकांनी केले.

गैरप्रकार रोखण्यासाठी माहिती द्याः परीक्षेच्या अनुषंगाने काही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यावर तात्काळ ०२०-२६१२२२५६ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत संपर्क साधावा. त्याचबरोबर नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. याबाबत arogyabharti2021@gmail.com या ई-मेल वर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन कराः उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा