औरंगाबाद की संभाजीनगर?: अजितदादा म्हणाले तिढा सुटणार, आठवलेही भाजपच्या विरोधात

0
135

मुंबई/ नाशिकः औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत औरंगाबादच्या नामांतरावरून मतभेदाची ठिणगी पडेल, अशी अपेक्षा भाजपला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र औरंगाबादच्या नामांतराचा तिढा सुटेल, असे संकेत दिले आहेत.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जात आहे. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्यावर एकत्र बसून तोडगा काढतील. विशेष म्हणजे काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. यासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम आखला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना असा प्रसंग येतच असतो आणि आम्ही त्यातून सामोपचाराने निश्चितच मार्ग काढू असे अजित पवार म्हणाले.

भाजपकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याच्या मुद्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. सरकारे येत असतात, जात असतात, सूडबुद्धीने कोणीही काहीही करू नये. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्याने कारवाई झाली पाहिजे. काहींना राजकारण करायचे आहे. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.

रामदास आठवलेंची कोलांटउडीः १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती. मागच्या सरकारमध्येही शिवसेना होती, त्याहीवेळी शिवसेनेला नामांतर करता आले असते, असे सांगणारे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका तातडीने बदलली असून औरंगाबादच्या नामांतराला रिपाइंचा विरोध असेल अशी नवी भूमिका घेतली आहे. एकीकडे भाजप औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला धारेवर धरत असताना भाजपच्याच मित्र पक्षाने नामांतराच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

नामांतराच्या विषय जाहिरनाम्यात नव्हताः दरम्यान, काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात औरंगाबादच्या नामांतराचा विषयच नव्हता, असे चव्हाण म्हणाले. कुठल्याही शहराचे नाव बदलण्यापेक्षा तेथील रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देणे आम्हाला महत्वाचे वाटते. औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा