नामांतराचे राजकारण पेटलेः औरंगाबादनंतर आता पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी

0
206
संग्रहित छायाचित्र.

पुणेः औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून शिवसेना- भाजप एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पुण्याच्या नामांतराची मागणीही पुढे आली आहे. पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून राजकारण पेटले आहे. भाजपने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेनेही तुमची पाच वर्षे सत्ता असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर का केले नाही? असा सवाल करत भाजपला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता पुण्याच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे.

हेही वाचाः औरंगाबाद की संभाजीनगर?: अजितदादा म्हणाले तिढा सुटणार, आठवलेही भाजपच्या विरोधात

राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेले पुणे वसवले. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे जिजापूर असे नामांतर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यानी केली आहे. पुणे जिल्हा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याही शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बालशिवबाला घेऊन सोन्याचा नांगर चालवून पुणे वसले. त्या पुण्याचे आज सोने झालेले आहे, असे शिंदे म्हणाले.

औरंगाबाद पाठोपाठ आता पुण्याच्याही नामांतराची मागणी पुढे आल्यामुळे या मुद्यावरूनही राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादबरोबरच अहमदनगरचेही अवंती असे नामांतर करा, अशी मागणी केली आहे. राज्यातील शहरांची नावे बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेना- भाजप आमने-सामने आलेले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची शिवसेनेची जुनीच मागणी आहे. यापूर्वी औरंगाबादचे नामांतर करण्यातही आले होते. परंतु न्यायालयाने या नामांतराला स्थगिती दिली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा