जावेद अख्तर यांची अभिनेत्री कंगनाविरुद्ध अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीची तक्रार!

0
99
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विट करून कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिच्याविरुद्ध प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनवर बदनामीकारक शेरेबाजी केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 अभिनेत्री कंगना रणौतने जुलै महिन्यात रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याविरुद्ध काही विधाने केली होती. त्यामुळे व्यथित झालेल्या जावेद अख्तर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कंगनाने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कारण नसताना आपले नाव गोवले. ही मुलाखत रिपब्लिक टीव्ही चॅनलची वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर लाखो लोकांनी पाहिली. टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी न्यूजसारख्या अन्य माध्यमांनीही ही मुलाखत कव्हर केली, असे जावेद अख्तर यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

कंगनाने विनाकारण या प्रकरणात आपले नाव गोवल्यामुळे आपली बदमानी झाली असून भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसार या कंगनाने केलेल्या या गुन्ह्याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या नेशन वॉन्ट टू नो या कार्यक्रमात कंगनाची ही मुलाखत घेण्यात आली होती. त्यात जावेद अख्तर हे ‘सुसाइड गँग’चाच एक भाग असून मुंबईत ते काहीही मिळवू शकतात, असे कंगनाने म्हटले होते. प्रसिद्धी मिळवण्याच्या गुन्हेगारी आणि वैयक्तिक हव्यासातून कंगनाने असे बिनबुडाचे आरोप केल्यामुळे आपली बदनामी झाली, असे जावेद अख्तर यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा