सात दिवस धाकधूकः औरंगाबादेतील ब्रिटन रिटर्न पॉझिटिव्ह महिलेचा अहवाल येणार सात दिवसांनी!

0
115

औरंगाबादः ब्रिटनहून औरंगाबादेत आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७ वर्षीय महिलेच्या लाळेचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यासाठी सात दिवस वाट पहावी लागणार आहे. या महिलेला लागण झालेला कोरोना ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना तर नाही ना यासाठी हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांचे सात दिवस धाकधुकीतच जाणार आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही गेल्या महिनाभरात ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. औरंगाबादेत अशाच शोध मोहिमेत ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या महिलेवर सध्या धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिला लागण झालेला कोरोना ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना तर नाही ना? याचा शोध घेण्यासाठी महिलेच्या लाळेचा नमुना पुणे येथील एनआयव्ही प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त होण्यास सात दिवस लागणार आहे. अशी माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

बेपत्ता १३ नागरिकांचा पासपोर्टवरून शोधः ब्रिटनहून शहरात आलेल्या १३ नागरिकांचा शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात असून पोलिसांना त्या नागरिकांचे नाव व पत्त्यासह यादी सोपविण्यात आली आहे. नागरिकांचा नेमका पत्ता शोधण्यासाठी पासपोर्ट नंबरचा उपयोग करुन त्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे पाडळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद महानगरपालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान शहरात ब्रिटन येथून ४४ नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ३६ नागरिक महापालिका क्षेत्रातील असून त्यातील १३ नागरिकांचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनापत्र देण्यात आले आहे. १३ जणांच्या नाव व पत्त्यासह यादी पोलीसांकडे पाठवण्यात आली असून त्यांचा मोबाईलनंबर लागत नसल्यामुळे पासपोर्ट नंबरवरुन त्यांच्या घरांचा पत्ता काढून पोलीस त्यांना शोधणार आहेत. त्यांचा शोध लागताच त्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करुन घेतली जाणार असल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

चौघांचे अहवाल निगेटिव्ह, सात जणांचे घेतले स्वॅबः ब्रिटन येथून आलेल्या चार नागरिकांची शुक्रवारी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. नांदेड येथे गेलेले चार जण आणि पुणे येथे गेलेला एक जण परत आले असून त्यांची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. शहरात असलेल्या दोघांनी देखील आरटीपीसीआर कोरोना चाचणी करुन घेतली. त्यांचा अहवाल उद्या रविवारी प्राप्त होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा