अर्णब गोस्वामींकडे न्यायालयीन कोठडीत मोबाइल आलाच कसा?, चौकशी सुरु

0
341
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडे न्यायालयीन कोठडीत असताना मोबाइल आलाच कसा? त्यांना तो कुणी दिला? याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडे मोबाइल असल्याचे लक्षात आले आहे.

मुंबई आणि रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. अलिबागच्या सत्र न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अर्णब यांना अलिबाग नगर पालिकेच्या शाळेत कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. येथेच कोठडीत असताना अर्णब यांनी मोबाइलचा वापर केल्याचा आरोप आहे.

 अर्णब गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याची माहिती रायगड गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. मोबाइल फोनवरून ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचे गुन्हे शाखेच्या लक्षात आले. बुधवारी त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला होता. रायगड गुन्हे शाखेने अलिबागच्या तुरुंग अधीक्षकांना याबाबत तातडीने पत्र लिहिले आणि अर्णब यांच्याकडे न्यायालयीन कोठडीत असताना मोबाइल कुठून आला? याची चौकशी करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली. रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे तपास अधिकारी जमील शेख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, अलिबागमधील तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये अर्णब यांच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आज त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. अलिबाग येथील कारागृह अर्णब आणि अन्य दोन आरोपींसाठी सुरक्षित नसल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने पोलिसांना वरिष्ठांची परवानगी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार तुरुंगमहानिरीक्षकांच्या परवानगीने रविवारी या तिघांना तळोजा तुरुंगात हलवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा