Explained: चाय बिस्किटवाले पत्रकारः ‘पूछता है भारत को’ क्यूं कुटता है भारत?

0
37

मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही नेटवर्कच्या रिपब्लिक भारत टीव्हीच्या पत्रकाराला मुंबईत कथित मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे. सोशल मीडियावरही गेल्या दोन दिवसांपासून चायबिस्कुट हा ट्रेंड जोरात आहे. २४ सप्टेंबरला, गुरूवारी सकाळी नेमके काय घडले? रिपब्लिक भारतचा पत्रकार प्रदीप भंडारीवर आपल्याच बिरादरीच्या लोकांकडून असा कानाखाली ‘सन्मान’ करून घेण्याची वेळ का आली?  एनडीटीव्ही आणि एबीपी न्यूजच्या पत्रकारांनी आपल्यावर हल्ला केला, अशी आवई भंडारींनी उठवली. पण नेमके खरे काय? त्याचा हा वृत्तांत…

मुंबईच्या कुलाबास्थित नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर सुशांतसिंह राजपूत प्रकरणी चोहोबाजूंनी होत असलेली मीडिया नौटंकी रिपब्लिक भारतचे संपाद प्रदीप भंडारीच्या कानाखाली वाजवल्याबरोबरच रसातळाला गेली. प्रदीप भंडारीकडून अन्य पत्रकारांचा अपमान, हमरीतुमरी आणि काही पोलिसांनी मध्ये पडून मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न असा हा एकूणच ड्रामा गुरूवारी घडला. सुशांतसिंह राजपूतचा जूनमध्ये मृत्यू झाल्यानंतर चोहो बाजूंनी झालेल्या बिभत्स पत्रकारितेत ही घटना एक नवा अध्याय ठरली. न्यूजलॉन्ड्रीने या घटनेच्या मुळाशी जात वृत्तांत प्रकाशित केला आहे. न्यूजलॉन्ड्रीने घटनास्थळी उपस्थित चार पत्रकारांशी संपर्क केला असता त्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर एनसीबीच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या घटनाक्रमाचा संपूर्ण तपशील सांगितला. भंडारी हा कायम अन्य पत्रकारांना डिवचण्याचा, उचकावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या पत्रकारांनी सांगितले.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत बाहेर आलेले ‘ड्रग्जचे जाळे’ कव्हर करण्यासाठी सकाळपासूनच मीडियाचे लोक तेथे एकत्र जमले होते. सकाळी सुमारे ९ वाजता फॅशन डिझायनर सिमोन खम्बाटा चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले आणि तेथे उपस्थित पत्रकार आणि त्यांच्या कॅमेरा टीम व्हिडीओ घेण्यासाठी एनसीबी कार्यालयाच्या गेटच्या आसपास गोळा झाले.

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सांगितले की, जेव्हा मी तेथे उभा होतो, तेव्हा एनडीव्हीटीचे पत्रकार रिपब्लिकच्या पत्रकाराला आमच्या कॅमेरा फ्रेममध्ये येऊ नको, असे सांगताना मी पाहिले. मी एनसीबी इमारतीच्या समोर उभा राहण्यासाठी रस्ता ओलांडला. जेव्हा मी अन्य काही पत्रकारांशी बोलत होतो, तेव्हा एनडीटीव्हीचे पत्रकार रिपब्लिकच्या पत्रकाराला आमच्या फ्रेममध्ये येऊ नको म्हणून विनंती करत असल्याचे पाहिले.

ज्या रिपब्लिकच्या पत्रकाराबद्दल मी सांगत आहे तो प्रदीप भंडारी आहे. तो तेथून थेट प्रक्षेपण करत होता. तुम्ही २५ मीटर अंतरावरूनही ऐकू शकाल एवढ्या मोठमोठ्याने तो (प्रदीप) बोलतो. ‘आताच सिमोन खम्बाटा आत गेली आहे आणि आम्ही सांगत आहोत आपणाला बातमी, चाय बिस्किटवाले पत्रकार तुम्हाला बातमी देणार नाहीत, आम्ही देऊ तुम्हाला बातमी’, असे तो आपल्या थेट प्रक्षेपणात म्हणाला.

प्रदीप भंडारी तेथे उपस्थित अन्य पत्रकारांना डिवचण्यासाठीच असे बोलत होता आणि तो पुन्हा एकदा एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये आला. ‘एनडीटीव्हीचे पत्रकार त्यांच्याकडे गेले आणि असे करू नको म्हणून पुन्हा एकदा त्याला सांगितले.’ भंडारीच्या टोमण्यावर आक्षेप घेण्यासाठीच एनडीटीव्हीचे पत्रकार भंडारीजवळ गेले असे भंडारीच्या ‘चायबिस्किट’च्या टोमण्यामुळे नाराज झालेल्या अन्य पत्रकारांना वाटले. त्याच्या टोमण्यामुळे प्रत्येक जणच नाराज झालेला होता, म्हणून सगळेच पत्रकार त्याच्याकडे गेले’, असे या पत्रकाराने सांगितले.

 येथेच सगळा गोंधळ उडाला. ‘भंडारी आणि अन्य पत्रकारांत शिविगाळ सुरू झाली. त्यातच एका पत्रकाराने भंडारीला चापट मारली. त्यानंतर रिपब्लिकचे सोहेल सय्यद, एनडीटीव्हीचे सुनिल सिंग आणि टाइम्स नाऊचे इम्रान यांच्यासारख्या पत्रकारांनी हस्तक्षेप करू हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. एनडीटीव्हीचे पत्रकार आपल्यावर ‘हल्ला’ करण्यासाठीच येत आहेत असे भंडारीला वाटले. एनडीटीव्हीच्या पत्रकाराला मी गेल्या १२ वर्षांपासून ओळखतो. कुणावर हल्ला करणाऱ्यांपैकी तो नाही,’ असे सांगतानाच भंडारीला मारहाण करायला नको होती, असे हा पत्रकार म्हणाला. परंतु अन्य पत्रकारांना टोमणे मारण्याची आणि त्यांना अपमानित करण्याची भंडारीची ही काही पहिलीच वेळ नाही, असे सांगायलाही हा पत्रकार विसरला नाही.

 त्याच दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या थेट प्रक्षेपणात प्रदीप भंडारी अन्य पत्रकारांना ‘चाय बिस्किटवाले पत्रकार’ संबोधत असल्याचे तुम्ही ऐकू शकता. या थेट प्रक्षेपणात भंडारी म्हणतो, ‘रिपब्लिक मीडिया के साथ सच्चाई का समुंदर हे, इनके साथ ड्रग्ज का समुंदर है… जनता ने सच्चाई के समुंदर को चूज किया है…. ये फुद्दू क्या बताएंगे.’ (फुद्दू हा डरपोक या शब्दासाठी अपमानजनक लिंगभेदी शब्द वापरला जातो.)

भंडारीला थेट प्रक्षेपणात मोठमोठ्याने ओरडण्याची आणि इकडून तिकडे उड्या मारण्याची सवय आहे, असे तेथे उपस्थित अन्य एका पत्रकाराने मान्य केले. सकाळीही तो वारंवार माझ्या कॅमेरा फ्रेममध्ये येत होता, असेही हा पत्रकार म्हणाला. ‘भंडारीच्या या सवयीमुळे अनेकवेळा अन्य पत्रकारांना थेट प्रक्षेपण करताना अडचणी येतात. तुझा आवाज कमी ठेव अशी व्यक्तिशः विनंती मी त्याला याआधीही केली होती. आणि आज त्याने एनडीटीव्हीच्या पत्रकाराच्या फ्रेमच्या एकदम मागे उभा राहून ओरडायला सुरूवात केली,’ असे हा पत्रकार म्हणाला.

जेव्हा प्रदीपला बाजूला व्हायला सांगितले तर तो म्हणाला, ‘तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हीच इथून निघून जा’. तेव्हा मीच एनडीटीव्हीच्या पत्रकाराला समजूतदारपणे घेण्याचे सांगितले. पण जेव्हा प्रदीप भंडारी आम्हाला चाय बिस्किटवाले पत्रकार म्हणताना मी ऐकले तेव्हा मलाही राग आला होता, असे हा पत्रकार म्हणाला.

त्याने आमच्याकडे इशारा करत चाय बिस्किट पत्रकार, जे आपल्या चॅनलसाठी टीआरपीही मिळवू शकत नाहीत, असे आम्हाला म्हटले. आपल्याच सहकाऱ्यांची तू बेईज्जती का करतोस, असे मी त्याला विचारले. बाकीचे पत्रकारही त्यात पडले आणि सगळेच प्रकरण हाताबाहेर गेले. बाकीचे लोकही शिविगाळ करू लागले. रिपब्लिकचे थेट प्रक्षेपण होऊ लागले. प्रदीप अन्य पत्रकारांना शिविगाळ करू लागला आणि त्याने एका पत्रकाराला मागे खेचले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला. नंतर पोलिसांनाही या भांडणात हस्तक्षेप केला.

प्रदीप भंडारीला थापड मारणाऱ्या पत्रकाराशीही न्यूजलॉन्ड्रीने संपर्क साधला. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेपेक्षा हा वेगळा पत्रकार आहे. तो ना एबीपी न्यूजचा आहे ना एनडीटीव्हीचा. प्रदीप भंडारीला थापड मारणारे पत्रकार विनोद जगदाळे आहेत, ते न्यूज २४ चे काम करतात आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ‘तो थेट प्रक्षेपण करू लागला आणि म्हणाला की, एनडीटीव्हीचे पत्रकार कुठिंत आहेत. ते येथे चाय बिस्किट खाण्यासाठी येतात.’ मी त्याच्याकडे जाऊन त्याला नीट बोल म्हणून सांगितले परंतु त्याने मलाच शिविगाळ केली. त्यानंतर मी त्याला थापड मारली, असे जगदाळे यांनी न्यूजलॉन्ड्रीला सांगितले.

आपली चूक झाल्याचे मान्य करत जगदाळे म्हणाले की, गेल्या महिन्यांपासून प्रदीप भंडारी अन्य पत्रकारांना वारंवार अपमानित करतो आहे. तो अन्य पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरतो. मी कुठल्याही असहाय्य व्यक्ती किंवा आपल्याच क्षेत्रातील व्यक्तीशी भांडण करण्याच्या फंदात कधीच पडत नाही. पण त्याने हद्दच ओलांडली होती.

प्रदीप भंडारीशीही न्यूजलॉन्ड्रीने संपर्क केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. मात्र ट्विटरवर त्याने ‘गुंड पत्रकारांनी मला घेरून मारण्याचा प्रयत्न केला.’ ‘खरे बोलण्यापासून रोखण्यासाठीच एनडीटीव्ही आणि एबीपी न्यूजच्या पत्रकारांनी माझ्यावर हल्ला केला,’ असा आरोप केला आहे. गुरूवारी सायंकाळी प्रदीप भंडारीच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे. जगदाळे यांनी ही तक्रार दिली असून एनडीटीव्हीचे सौरभ गुप्ता आणि एबीपी न्यूजचे पत्रकार मनोज वर्मा हे या तक्रारीत साक्षीदार आहेत.

मूळ इंग्रजी वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीव्ही रिस्पेक्ट पॉइंट्स (टीआरपी) गमावलेः या सर्व प्रकारानंतर प्रदीप भंडारी खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरू लागला आहे. त्यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रदीप भंडारीचा खासगी सुरक्षा रक्षकाच्या गराड्यातील एक फोटो शेअर करून टिप्पणी केली आहे. ‘ हे छायाचित्र कदाचित केळ्याच्या प्रजासत्ताक काळातील टीव्ही मीडिया परिभाषित करेल. जेव्हा एखादे ‘आरडाओरड’ करणारे चॅनल आपल्या कथित पत्रकाराचे अन्य सहकारी पत्रकारांपासून ‘संरक्षण’ करण्यासाठी खासगी सुरक्षा भाड्याने घेते. हे त्या चॅनेलने अत्यंत अमूल्य असा टीआरपी गमावल्याचेच द्योतक आहे. टीआरपीः टीव्ही रिस्पेक्ट पॉइंट्स ऑफ यूवर पीअर्स! ( आपल्याच सहकाऱ्यांकडून मिळणारा टीव्ही सन्मान बिंदू), असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा