एसटीतील लिपिकाने हडपले सेवानिवृत्तीचे ८ लाख रूपये, जाब विचारताच केला बसचालकाचा खून!

0
501

औरंगाबादः एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या बसचालकाची खोटी स्वाक्षरी करून त्याच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ८ लाख रुपयांची रक्कम विभाग नियंत्रक कार्यालयातील लिपिकानेच बनावट स्वाक्षऱ्या करून हडप केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या निवृत्त बसचालकाचे त्या लिपिकाने अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला आणि धडावेगळे शिर करून धड एकीकडे तर शिर दुसरीकडेच फेकून दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे.

एसटी महामंडळातील मुजीब अहेमद खान आबेद रशीद खान (५९, रा. शहानगर, बीड बायपास)बसचालक मुजीब खान हे डिसेंबर १९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीची रक्कम काढण्यासाठी त्यांनी विभागीय कार्यालयातील लिपिक अतिक काझी याच्याकडे कोऱ्या चेकवर स्वाक्षऱ्या करुन दिल्या होत्या. त्यानंतर मुजीब खान हे धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी निघून गेले. तेथून परतल्यानंतर लगेचच त्यांनी काझीकडे पैशासाठी तगादा सुरू केला. मात्र, तोपर्यंत अतिक काझीने एसटी महामंडळाच्या रेकॉर्डवर बनावट स्वाक्षरी आधारे पुष्पनगरी रस्त्यावरील स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून मुजीब खान यांच्या खात्यावरील सेवानिवृत्तीची आठ लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली होती. याची माहिती मिळाल्याने मुजीब खान यांनी अतिक काझीकडे पैशासाठी तगादा लावत पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्याचे धमकावले होते.

विभाग नियंत्रक कार्यालयातून कारने नेलेः ९ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मुजीब खान यांनी अतिक काझीला विभागीय कार्यालयात गाठले. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने मुजीब खान यांना कारमध्ये बसवून देवळाई येथील नातेवाईकाकडे रक्कम आणण्यासाठी जायचे असे म्हणत सोबत नेले. यावेळी मुजीब खान यांनी पत्नीशी संपर्क साधून तिला काझीसोबत कारने जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काझीने वर्गमित्र असलेल्या अफरोज खानच्या घरी नेले. काहीवेळ तेथे मुजीब खान यांना थांबवून ठेवले. त्यानंतर त्यांचे तोंड दाबून पाठीमागून लोखंडी रॉडने वार केला. मुजीब खान हे बेशुध्द होताच तीक्ष्ण हत्याराने त्यांचे शिर कापून धडावेगळे केले.

पुरावा नष्ट करण्यासाठी केली मृतदेहाची केली खांडोळीः मुजीब खान यांच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी अतिक काझी आणि अफरोज खान यांनी सिमेंटचे एक पोते रिकामे केले. त्यात मृत मुजीब खान यांचे धड टाकून त्यावर सिमेंट आणि दगड टाकले. त्यानंतर शिरदेखील एका सिमेंटच्या पोत्यात भरुन कारने सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहीरीजवळ गेले. तत्पूर्वी त्यांनी मुजीब खान यांचा मोबाइल व त्यातील सिमकार्ड सातारा परिसरात एका ठिकाणी फेकून दिले. पुढे विहीरीत त्यांनी धड असलेले सिमेंटचे पोते फेकून दिले. तर शिर असलेले पोते झाल्टा फाट्याजवळील एका पडक्या खोलीजवळील झाडा-झुडूपात फेकले. त्यानंतर दोघेही तेथून परतले.

मुलाने दिली होती हरवल्याची तक्रार पण लिपिकावर घेतला होता संशयः ९ जुलैला रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुजीब खान यांचा मुलगा रशीद खान याने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी लिपीक अतिक काझी याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यावरुन त्याची दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती. मुजीब खान यांच्या नातेवाइकांनी अतिक काझीवर संशय व्यक्त केला होता. त्यावरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहायक फौजदार नसीम पठाण, जमादार सलीम सय्यद, पोलिस नाईक राजेश फिरंगे, शिपाई मनोज चव्हाण, मिलींद भंडारे, संतोष रेड्डी, दयानंद मरसाळे यांच्या पथकाने रविवारी विभागीय कार्यालयातील सीसीटिव्ही कॅमेरांची तपासणी केली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंगः सीसीटीव्ही तपासणीत मुजीब खान हे सायकल उभी करुन कार्यालयात जाताना दिसून आले. तसेच अतिक काझी देखील त्यानंतर बाहेर पडताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिक काझीच्या कारची तपासणी करण्यासाठी रविवारीच बीड बायपास रस्त्यावरील सीसी टिव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्याची कार काही वेळेच्या अंतरावर जाताना आणि येताना सीसीटीव्हीत दिसून आली. त्यानंतर अतिक काझीला खाक्या दाखवण्यात आला. त्याने रात्री खूनाची कबुली दिल्यानंतर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी लिपीक अतिक अमीर काझी (३५, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) आणि अफरोज खान जलील खान (३५, रा. रेणुकामाता मंदिराच्या कमानीजवळ, सातारा परिसर) यांना अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा