हतबलतेचे उद्गारः आता चंद्रकांत पाटील म्हणतात, २०१९ मध्ये शिवसेना-भाजपत दुरावा निर्माण केला

0
393
संग्रहित छायाचित्र.

सांगलीः जवळपास पंचवीस वर्षे सोबत राहिलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार आज पडेल, उद्या पडेल आणि पुन्हा आपलीच सत्ता येईल, असे स्वप्न बघणारा भाजप आता हतबल झाल्याचे आज स्पष्ट झाले. महाविकास आघाडी सरकार काही पडेना आणि आपली सत्ता काही येईना, हे स्पष्टपणे दिसू लागल्यामुळे आता भाजपवाले भूतकाळात शिरू लागले आहेत. २०१९ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये काही जणांनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला, असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज काढले. त्यांचे हे उद्गार भाजपच्या ‘हतबलते’चाच पुरावा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेला भाजप विविध मुद्यांवरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जवळपास पंचवीस वर्षे युतीत राहिलेले हे दोन पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ता संघर्षात एकमेकांपासून विभक्त झाले आणि शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. त्यातच महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, ते स्वतःच्याच ओझ्याने पडेल आणि पुन्हा आमची सत्ता येईल, अशी विधाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह अनेक भाजप नेते वारंवार करत आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची आणि पुन्हा आपली सत्ता येण्याची चिन्हे भाजप नेत्यांना दिसत नसल्यामुळे ते आता भूतकाळात शिरून ‘आत्मचिंतन’ करू लागल्याचेच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे भाजप पुरता हतबल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

२०१९ मध्ये शिवसेना-भाजपमध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा झाला. परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मला एकच प्रश्नाचे उत्तर द्या की, संजय राऊत व्यतिरिक्त कुणी बोलताना दिसतेय का? आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले? आमचे अतिपरममित्र खूप दोस्ती आहे आमची असे रामदास कदम कुठे गेले? अनिल देसाई, सुभाष देसाई, रवि वायकर कुठे गेले? कुठे गेले सगळेजण?, असे प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतच चलबिचल निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा