कोरोनाचा कहरः तीनच दिवसांत देशात १० हजार रूग्ण, ११ दिवसांत रूग्णवाढीचा वेग दुप्पट

0
157

नवी दिल्लीः देशभरात गेल्या तीनच दिवसांत १० हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. देशात गुरूवारपर्यंत ५२ हजार ९५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १ हजार ७८३ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशातील ४० हजार कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचायला अवघे तीनच दिवस लागल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसू लागले आहे. यापूर्वी ३० हजारांचा आकडा ४० हजारांवर पोहोचण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला होता. त्याआधी २० हजारांहून ३० हजारांवर पोहोचण्यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागला होता तर प्रारंभी कोरोना बाधितांचा आकडा १० हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी ४३ दिवस लागले होते. प्राप्त आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत चालला आहे. गेल्या ११ दिवसांत कोरोना रूग्णवाढीचा वेग दुप्पटीवर पोहोचला आहे.

२ मे रोजी भारतात २, २९३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. ३ मे रोजी २ हजार ६४४, ४ मे रोजी २ हजार ५५३, ५ मे रोजी ३ हजार ९००, ६ मे रोजी २ हजार ९०० हून अधिक तर ७ मे रोजी ३ हजार ५६१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. ४० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा लॉकडाऊन ठेवूनही कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे.

 देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवशी म्हणजेच २४ मार्च रोजी देशात केवळ ५१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. तर त्याच्या महिनाभरानंतर म्हणजेच २४ एप्रिल रोजी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या १ हजार ३२४ वर पोहोचली होती.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर कोरोना बाधित लोकांची संख्या १० हजारांवर पोहोचल्यानंतर देशभरातील लोकांना धक्का बसला होता आणि चिंतेतही टाकले होते. मात्र आता एकट्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच कोरोना बाधित रूग्णांचा आकडा ११ हजार ३९४ वर पोहोचला आहे आणि ४३७ लोकांचा बळी गेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा