गळ्यावर तलवारी ठेवून जवानाचे घर लुटले, हिंगोलीत भल्या पहाटे धाडसी दरोडा

0
116
प्रातिनिधिक छायाचित्र

हिंगोलीः शहरातील सुराणा नगर भागात राहणाऱ्या राज्य राखीव दलातील जवानाच्या घरावर आज पहाटे धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी जवानाच्या कुटुंबीयाच्या गळ्यावर तलवारी ठेवून घरातील मुद्देमाल लुटून नेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील सुराणा नगर भागात राज्य राखीव दलाचे ( एसआरपीएफ) जवान आर. व्ही. त्रिमुखे राहतात. आज पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास  दहा ते बारा दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून त्रिमुखे यांच्या घराच्या गेट कुलूप तोडून घराचा दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. दरवाजा तोडण्याच्या आवाजाने घरातील कुटुंबीय जागे झाले. परंतु घरात प्रवेश करताच दरोडेखोरांनी सर्वांच्या गळ्याला तलवारी लावल्या. तर त्रिमुखे यांच्या भावाचे हातपाय बांधून आवाज केला तर जीवे मारीन, अशी धमकी दिली.

त्रिमुखे हे बाहेरगावी कर्तव्यावर आहेत. घरात त्यांचे आईवडिल, भाऊ आणि पत्नीच होते. दरोडेखोरांनी त्रिमुखे यांचे आईवडिल आणि पत्नीच्या गळ्याला तलवारी लावल्या आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि अंगावरील दागिने आणि मोबाइल हिसकावून दरोडेखोर पसार झाले.

या प्रकारामुळे हादरून गेलेल्या त्रिमुखे कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण केले. परंतु घटनास्थळापासून काही अंतरावर गेल्यानंतर श्वान घुटमळले. त्यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या दरोडेखोरांनी तोंडे बांधलेली होती. त्यांच्या अंगावर जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट होते. हे दरोडेखोर वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या आसपास असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा