छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे वादग्रस्त वक्तव्य, शिवप्रेमी संतप्त

0
1711
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच संभाजी ब्रिगेडनेही राजनाथ सिंह यांच्यावर टिकास्त्र सोडले असून राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राची आणि तमाम शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुण्यातील एका स्टेडियमला टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून असे शिक्षण दिले होते की, त्यामुळे शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले, असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात केले.

 राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र आक्षेप घेत त्यांचा निषेध केला आहे. राजनाथ सिंह यांनी चुकीच्या किंवा ऐकीव माहितीवर हे विधान केलेले असावे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे राष्ट्रनायक ठरले, असे खा. कोल्हे यांनी म्हटले आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीच्या सुरूवातीच्या प्रयत्नांबद्दल दादोजी कोंडदेव हे नाराज होते. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती, असे ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यानंतर समजते. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते, असेही खा. कोल्हे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची माफी मागाः राजनाथ सिंह यांनी खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमात सांगून अज्ञानाचे दर्शन घडवले आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अज्ञान आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाशी गद्दारी करू नये. राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राची व तमाव शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिलेले नाही. तसा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. संरक्षण मंत्री हे खोटे बोलतात. त्यांनी चुकीचा इतिहास मांडला. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राजनाथ सिंह यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

शिवप्रेमी जनताच भाजपची कबर खोदेल- मिटकरीः राजनाथ सिंह यांनी केलेले वक्तव्य हे अकलेचे दिवाळे काढणारे आहे. भाजप अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम होतेच आहे. राहिलेली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थोडा अभ्यास करून बोला, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदेल आणि तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल, अशी आक्रमक प्रतिक्रिया शिवव्याख्याते आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा