‘लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीसाठी पैसे जमा केले पण जिर्णोद्धार केलाच नाही!’

0
142
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली’, असा दावा केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांचा हा दावा अनेकांनी सपशेल नाकारला आहे. लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले परंतु शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केलाच नाही, असे जोरकस दावे ऐतिहासिक संदर्भ देत अनेकांनी केले आहेत. शिवरायांची समाधी टिळकांनी नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून ठेवली होती, याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ देत राज ठाकरेंचा दावा खोडून काढण्यात आला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत छत्रपती शिवरायांच्या समाधीबाबत केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून टिळकांनी समाधीसाठी पैसे जमा केले होते. पण त्यांनी जिर्णोद्धार केलाच नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड म्हणाले, १८६९ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही अर्काईव्हमध्ये उपलब्ध आहे. म. फुलेंनी समाधीच्या जिर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती. त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यांतच त्यांचे निधन झाले.

महात्मा फुलेंच्या निधनानंतर कालांतराने ही मोहीम थांबली. त्यानंतर १८९५ मध्ये टिळकांनी हे काम हाती घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोनवेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले. तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जिर्णोद्धार समिती स्थापन केली होती. त्यासाठी निधीही गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले, असे आव्हाड म्हणाले. छत्रपती शिवरायांची समाधी संभाजी महाराजांनी बांधून ठेवली होती, पण नंतर ती दुर्लक्षित करण्यात आली, पत्र व्यवस्थित वाचा, असे म्हणत आव्हाड यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे एक पत्रच ट्विट केले आहे.

टिळकांनी ना समाधी शोधली, ना जिर्णोद्धार केला’:  लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जिर्णोद्धार केला, ना समाधी शोधली. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जिर्णोद्धारासाठी पैसे जमा केले, पण जिर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जिर्णोद्धार केला, असेही गायकवाड म्हणाले.

फुलेंनी समाधी शोधली तेव्हा टिळक होते १३ वर्षांचेः ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. महात्मा जोतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली, तेव्हा टिळक फक्त १३ वर्षांचे होते, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादेतील फक्त शरद पवार यांच्यावर टिका करण्यासाठी आणि सभा टिळक, बाबासाहेब पुरंदरे यांचे गुणगाण गाण्यासाठीच होती का? असा सवालही भुजबळ यांनी केला आहे.

टिळक कुटुंबीय म्हणतात आमचा दावा नाहीचः टिळकांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी बांधल्याचा दावा राज ठाकरेंनी केला असला तरी टिळकांच्या कुटुंबीयांनीच मात्र तसा दावा करण्यास नकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही, असे टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी म्हटले आहे. लोकमान्य टिळकांनी काही फंड जमा केला होता. हा फंड त्यांनी डेक्कन बँकेत जमा केला होता. त्याचे पुरावेही त्यांनी केसरीमध्ये १८९९ मध्ये दिलेले होते. त्यानंतर डेक्कन बँक दिवाळखोरीत गेली. समाधीसाठी टिळकांनी २० हजारांचा निधी जमा केला होता, असेही कुणाल टिळक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा