रस्ते बंगालचे, कारखाने अमेरिकेचे,विकास मात्र उत्तर प्रदेशचा; जाहिरातीवरून योगी आदित्यनाथ वादात

0
693

नवी दिल्लीः  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर प्रदेशात परिवर्तन आणि विकास घडून येत आहे, असा दावा करणाऱ्या चमकोगिरीच्या जाहिरातबाजीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगलेच गोत्याच सापडले आहेत. आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात विकास आणि परिवर्तनाचे दावे करणाऱ्या या जाहिरातीत पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील मा उड्डाणपूल, अमेरिकेतील कारखान्यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले असून ‘रस्ते, बंगालचे, कारखाने अमेरिकेचे आणि विकास मात्र उत्तर प्रदेशचा’ असे म्हणत नेटकऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.

काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आज उत्तर प्रदेश सरकारची पूर्ण पान जाहिरात प्रकाशित झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर प्रदेशात विकास आणि परिवर्तन घडून येत आहे, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. २०१७ पूर्वी बाहेरचे लोक गुंतवणुकीच्या संदर्भात उत्तर प्रदेशचे नाव काढले तरी हसत होते. गेल्या साडेवर्षात आम्ही उत्तर प्रदेशबाबतचा हा नकारात्मक दृष्टिकोन आम्ही पुसून टाकला आहे. २०१६ मध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात सहाव्या क्रमांकावर आला आहे. २०१७ मध्ये येथील अर्थव्यवस्थेची झपाट्याने वाढ झाली आहे. २०२० मध्ये उत्तर प्रदेशही अर्थव्यवस्था ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था देशातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनवू. मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारू आणि पारदर्शक गुंतवणूक व्यवस्थाही आणू, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जाहिरातील केला आहे.

आवश्य वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

मात्र, या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या छायाचित्रांवरून वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातील वापरण्यात आलेले उड्डाणपुलाचे छायाचित्र हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील मा उड्डाणपुलाचे आहे. या छायाचित्रात दिसणाऱ्या इमारतीही कोलकात्यातील पंचतारांकित हॉटेलच्या आहेत आणि या उड्डाणपुलावरून कोलकात्याची खास ओळख असलेली पिवळ्या रंगाची ऍम्बेसिडर टॅक्सीही धावताना दिसत आहे. दुसरीकडे या जाहिरातील वापरण्यात आलेले दुसरे छायाचित्र हे अमेरिकेतील कारखान्याचे आहे.

चमकोगिरीच्या या जाहिरातबाजीवरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

रस्ते बंगालचे, फॅक्टरी अमेरिकेची परंतु विकास उत्तर प्रदेशचा. कोलकात्याचा रस्ता चोरला ठिक. कोलकात्यातील इमारतही चोरली ठिक. परंतु योगी या जाहिरातीतून पिवळी टॅक्सी काढून टाकायलाही विसरले, अशा शब्दांत पत्रकार रोहिणी सिंग यांनी योगींवर टिकास्त्र सोडले आहे.

‘ट्रान्सफॉर्मिंग उत्तर प्रदेश’ म्हणजे वृत्तपत्रात देशभर जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करायचे आणि कोलकात्यातील विकासाची छायाचित्रे चोरायची?, असा सवाल पत्रकार साकेत गोखले यांनी केला आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा बंगाल करणार का? का नाही? चांगली आयडिया आहे, असे पत्रकार वीर संघवी असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा