अंधश्रद्धेला खतपाणी?: डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील साईबाबांवरील संशोधन वादात

1
377
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी.साठी  शिर्डीच्या साईबाबांवर संशोधनाला दिलेली मान्यता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  सामाजिक परिवर्तनासाठी ऊभी हयात खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे चालणाऱ्या विद्यापीठात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विषयावर संशोधनाची परवानगी मिळतेच कशी?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. संदेश वाघ हे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शशीकांत गोंदकर या संशोधक विद्यार्थ्याला ‘साईबाबांचे सामाजिक कार्य- एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधनाला मान्यता देण्यात आली आहे. २०१४ मध्ये या संशोधक विद्यार्थ्याने या विषयावर संशोधन करण्यासाठी नोंदणी केली आहे. साईबाबांच्या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनाला परवानगी दिलीच कशी? असा आक्षेप रिपाइंचे (आठवले) मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी घेतला आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 साईबाबांना आमचा विरोध नाही. परंतु साईबाबांचे कोणतेही कार्य वैज्ञानिक नाही आणि त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनही नाही. साईबाबांचा ऐकलेला कार्यकाळ हा अंधश्रद्धेवर आधारित आहे. भारतीय इतिहासात साईबाबांच्या  शास्त्रीय नोंदीही आढळत नाहीत. मग या विषयाला मान्यता दिलीच कशी? असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या भक्तांविषयी आम्हाला संदेह नाही आणि त्यांची कुणाला भक्ती करायची असेल तर तो त्यांचा लोकशाहीने प्रदान केलेला अधिकार आहे. मात्र सामाजिक परिवर्तनासाठी उभी हयात खर्ची घालणाऱ्या आणि शिक्षणाचे महत्व पटवून देऊन समाज डोळस करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे जे विद्यापीठ चालते, त्याच विद्यापीठात एखादा विद्यार्थी पीएच.डी. साठी अशा विषयावर संशोधन कसे काय करू शकतो? आणि अशा विषयाला विद्यापीठाकडून मान्यताही कशी काय दिली जाते? असे सवाल गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना दिलेल्या निवेदनात केले आहेत.

प्री-व्हायवावरही आक्षेपः शशीकांत गोंदकर या संशोधक विद्यार्थ्याचे मार्गदर्शक डॉ. संदेश वाघ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही संशोधक मार्गदर्शक आहेत. विशेष म्हणजेच डॉ. वाघ हेच गोंदकर यांच्या प्री-व्हायवासाठी परीक्षक म्हणून आले होते. मार्गदर्शकच प्री-व्हायवासाठी परीक्षक म्हणून कोणत्या नियमानुसार उपस्थित राहू शकतात, असा आक्षेपही गायकवाड यांनी घेतला आहे. नियमाप्रमाणे गोंदकर यांचा प्री-व्हायवा विद्यापीठाच्या इतिहास विभागात होणे आवश्यक असतानाही मार्गदर्शकाने त्यांच्या सोयीसाठी हा प्री-व्हायवा खुलताबादच्या चिश्तिया महाविद्यालयात घेण्यात आल्याची तक्रारही गायकवाड यांनी केली आहे.

डॉ. वाघ म्हणतातः माझा त्याच्याशी संबंध नाहीः संबंधित विद्यार्थी हा हरिनारायण धमाले यांचा विद्यार्थी आहे. तो माझ्याकडे वर्ग करण्यात आला आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. त्याला मी गाईड बदलून घ्यायला सांगितले आहे, असे डॉ. संदेश वाघ यांचे आता म्हणणे आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या संदर्भात हा विद्यार्थी संशोधन करणार असल्याचेही डॉ. वाघ सांगतात. परंतु ‘साईबाबांचे सामाजिक कार्य- एक चिकित्सक अभ्यास’ या संशोधन विषयात शिर्डीच्या साईबाबा संस्थानविषयी संशोधन होणार असल्याचा कुठेही अर्थबोध होत नाही. हा संशोधन विषय साईबाबांच्या सामाजिक कार्याशीच निगडित आहे, हेच स्पष्ट होते.

डॉ. वाघांचा विद्यापीठाला इ-मेलः दरम्यान, डॉ. संदेश वाघ यांनी शशीकांत गोंदकर या संशोधक विद्यार्थ्याला मार्गदर्शक बदलून देण्यासाठी विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागाच्या उपकुलसचिवांना ई-मेलद्वारे नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. शशीकांत गोंदकर यांना या विषयावर संशोधन करण्यासाठी आरआरसीनेच २०१४ मध्ये मान्यता दिली आहे. आता या विषयावरून मला नाहक त्रास होत आहे आणि धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगत डॉ. वाघ यांनी हे नाहरकत प्रमाणपत्र दिले होते.

आरआरसीत कोण होते?: ज्या आरआरसीने ‘साईबाबांचे सामाजिक कार्य-एक चिकित्सक अभ्यास’ या संशोधन विषयाला मान्यता दिली, त्या आरआरसीत कोण होते? या आरआरसीच्या सदस्यांनी संशोधनाचा गोषवारा वाचला होता की नाही? विद्यापीठात पीएच.डी.साठी होणारे संशोधन हे शास्त्रीय तत्थ आणि गृहितकांच्या आधारावरच व्हायला हवे, हे आरआरसीचे सदस्य आणि संशोधन मार्गदर्शकांनाही मान्य आहे की नाही? असे सवाल उपस्थित होत असून विद्यापीठ आता या विषयाला मान्यता देणाऱ्या आरआरसीवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा