मराठवाड्यातील निजामकालीन शाळांसाठी २०० कोटी, १ हजार ७५ शाळांत बांधणार वर्गखोल्या

0
131
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  मराठवाड्यातील सन १९६० पूर्वीच्या निजामकालीन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला असून शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे २०० कोटी रुपयांचा निधी नुकताच पुरवणी मागणीत मंजूर झाला आहे. या निधीतून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १ हजार ७५ शाळांतील साडेतीन हजार वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम केले जाणार आहे.

निजामाच्या राजवटीखाली राहिलेल्या मराठवाड्यात अद्यापही काही ठिकाणी निजामकालीन इमारतींतच जिल्हा परिषदेच्या शाळा भरवण्यात येतात. या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १३० शाळा, बीड जिल्ह्यातील २९३, हिंगोली जिल्ह्यातील ४२, जालना जिल्ह्यातील २०३, लातूर जिल्ह्यातील ९४, नांदेड जिल्ह्यातील १५७, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१, परभणी जिल्ह्यातील ७५ अशा एकूण १ हजार ४५ शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीन हजार वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे.

मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचे बांधकाम व  दुरुस्ती करण्यात येणार असून शासकीय शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा