मराठवाड्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५५० कोटीः सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची घोषणा

0
101

औरंगाबादः मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका बसून खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस सेवादलाच्या वतीने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा प्रांरभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सत्तेचा फायदा हा मराठवाड्याच्या विकासासाठीच आहे. मागील सरकारची अनेक कामे अपूर्ण राहिलेली आहेत. जे मागचे सरकार करू शकले नाही, ती सर्व कामे मी पूर्ण करणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

कृषी काद्याविरोधात जनजागृती कराः केंद्र सरकारने आणलेले शेतकरीविरोधी कायदे सत्तेच्या जोरावर चर्चा न करताच मंजूर केले आहेत. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात हमीभावाची तरतूद नाही, शेतकरी देशोधडीला लागेल. मोठ्या उद्योजकांना त्यातही फक्त अदानी आणि अंबानी यांसारख्यांनाच फायदा होईल, असा हा कायदा आहे. चढ्या भावाने माल विकून सामान्य जनतेला लुटले जाईल, असे चव्हाण म्हणाले.

हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्र या सर्व ठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे. राहुल गांधी यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर या कायद्याला विरोध होत आहे. या कायद्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती घडवून आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा