अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये ऐन कोरोना काळात जिल्हाधिकारी बंगल्यावर ८२ लाखांची उधळपट्टी!

0
33

नांदेडः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्य सरकारची महसुली मिळकतच ठप्प होऊन आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आरोग्य विभागाच्या तातडीच्या गरजा भागवण्याखेरीज अन्य कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, असे राज्य सरकारचे सक्त आदेश असतानाही ऐन कोरोना काळात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरूस्ती आणि नुतनीकरणावर तब्बल ८१ लाख ९४ हजार ३०३० रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असून त्यासाठी नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने ऑनलाइन निविदाही जारी केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरण आणि दुरूस्तीवरील हा खर्च दलित वस्ती सुधार योजनेसाठी असलेल्या निधीतून केला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे सरकारी आदेश डावलून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याच नांदेडमध्ये हे काम केले जात आहे.

कोरोना संकटामुळे राज्याची आर्थिक घडी पुरती विस्कटून गेली आहे. महसुली उत्पन्नात लक्षणीय घट होऊनही कोरोनाग्रस्तावरील उपचाराची यंत्रणा उभारणे, त्यांना उपचार देणे यावरच राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची कामे वगळता अन्य कुठलीही कामे हाती घेऊ नये आणि त्यावर खर्चही करू नये, असे सक्त आदेश वित्त विभागाने दिले असतानाही राज्य सरकारचे आदेश धाब्यावर बसवून नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दुरूस्ती आणि नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यावर तब्बल८१ लाख ९४ हजार ३०३० रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.

कोणत्या बाबीसाठी किती उधळपट्टी?:

 • मॉड्यूलर किचनसाठी ११ लाख ९९ हजार ३१ रुपये.
 • १८००x२४००x६४० आकाराच्या वार्डरोबसाठी ५ लाख ८२ हजार ४६४ रुपये.
 • डिझायनर फॅब्रिक कर्टेनन्ससाठी ३ लाख ६९ हजार ७८० रुपये.
 • सहा आसनी लाडकी डायनिंग टेबलसह इम्पोर्टेड खुर्च्यांसाठी १ लाख रुपये.
 • डिझायनर किंग साईज डबलबेडसाठी १ लाख ६० हाजर ७१ रुपये.
 • इम्पोर्टेड डिझायनर क्वीन साईज डबलबेडसाठी ९१ हजार ७१ रुपये.
 • एल शेप सहा आसनी डिझायनर सोफा सेटसाठी १ लाख ७८ हजार ५७१ रुपये.
 • इम्पोर्टेड क्वालिटी चार आसनी डिझायनर सोफासेटसाठी ६९ हजार ६४३ रुपये.
 • इम्पोर्टेड क्वालिटी डिझायनर सोफा सेटसाठी (२+२+१ आसनी) १ लाख ६० हजार ७१४ रुपये.
 • इम्पोर्टेड क्वालिटी ६x६ राऊंड डिझायनर सोफा सेटसाठी ६७ हजार ८५७ रुपये.
 • १६००x७५० मिमी आकाराच्या पोर्सेलिन बाथ टबसाठी ८५ हजार ७१४ रुपये.
 • वॉल पेपरसाठी १ लाख ५५ रुपये.
 • टफन ग्लास डोअर शटरसाठी ९० हजार ७४ रुपये.

ऐन कोरोना काळात अशा राजेशाही साधनसामुग्रीवर खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यावर काही जणांनी आक्षेपही घेतले आहेत. या उधळपट्टीबाबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावर यांनी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.

नांदेडमधील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे हे संकट आटोक्यात आणून कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळवून देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. नांदेडमध्ये सद्यस्थितीत  उपलब्ध असलेली यंत्रणा आणि रूग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेसमोरील मोठी डोकेदुखी ठरू पहात आहे. अशात नांदेडचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. इटनकर हेच स्वतःच्या शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती आणि नुतनीकरणावर ८२ लाखांची उधळपट्टी करत असल्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.  

दलित वस्ती सुधारणेतून खर्च?: विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याची दुरूस्ती आणि नुतनीकरणावरील हा खर्च दलिवस्ती सुधार योजनेच्या निधीतून केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील दाताळा येथील दलित वस्तीतील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी ८१ लाख ९४ हजार ३०३ रुपयांचा निधी मंजूर आहे. हाच निधी वळवून त्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याची दुरूस्ती आणि नुतनीकरण करण्यात येत असल्याचा आरोप आहे.

कंधार तालुक्यातील दाताळा गावातील दलित वस्तीतील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठीचा निधीच बंगल्याच्या दुरूस्ती आणि नुतनीकरणासाठी?👇

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुरूस्ती आणि नुतनीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली ऑनलाइन निविदा आणि करावयाच्या कामाचा तपशील👇

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा