नोइंग आरएसएसः स्वयंसेवक होण्यासाठी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे आरएसएसकडून ब्रेनवॉश

0
111
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या आशीर्वादाने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रसार करत आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठात निर्धारित शिक्षण देण्याऐवजी आरएसएसचा स्वयंसेवक व्हावे यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यावर आक्षेप घेत या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

विश्व संवाद केंद्रातर्फे पुण्याच्या सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारी रोजी ‘नोइंग आरएसएस’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या सूचना फलकावर नोटीस लावून एमजेएमसी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या अभ्यासक्रमाच्या फ्रेमवर्कमध्ये ही कार्यशाळा असून ही बाब आपल्या आठवडी कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, असे या सूचनेत नमूद केले आहे. म्हणजे या विभागातील विद्यार्थी दरआठवड्याला ‘नोइंग आरएसएस’  कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, असाच अर्थ या सूचनेतून ध्वनित होतो. यावर महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला आहे.

विद्यापीठात निर्धारित शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक व्हावे यासाठी संघाच्या संघटना प्रयत्न करत आहेत. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. ते या संदर्भात योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

राज्यातील भाजप सरकार गेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार येऊन शंभर दिवस होत असले तरी भाजप सरकारच्या काळात सरकारी प्रशासनात घुसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना अद्यापही सक्रीय असल्याचा धक्कादायक प्रकार यामुळे उघडकीस आला आहे. आता सरकार काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा