पावसाळी अधिवेशनात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आमदारांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

0
21
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: विधिमंडळाच्या ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनात प्रवेशाकरिता कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवनात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आरटीपीसार चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

दोन्हीही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै या निर्धारित वैध कालावधीसाठीची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोरोना प्रतिपिंड चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुध्दा आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहिल.

मागील अधिवेशनांप्रमाणे विधान भवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात ३ आणि ४ जुलै रोजी सकाळी ९.०० ते सायं. ६.०० यावेळेत आरटीपीसीआर चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी काही जण कोरोना विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे दोन्हीही डोस घेतलेल्यांना सुध्दा आरटीपीसीआर चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे अत्यावश्यक असल्याचे मत या उच्चस्तरीय बैठकीत नोंदविण्यात आले.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव, राजेन्द्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालय समुहाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, मुंबई महापालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. प्रणिता टिपरे, डॉ. संतोष गायकवाड, विधानमंडळाचे विशेष कार्य अधिकारी, डॉ.अनिल महाजन, अवर सचिव, रविंद्र जगदाळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा