पक्षाला बदनाम कराल, तर गाठ माझ्याशी आहे: सुप्रिया सुळेंची राडेबाज कार्यकर्त्यांना दमबाजी

0
768
संग्रहित छायाचित्र.

पैठणः माझ्या बापाने रक्त आटवून हा पक्ष उभा केला आहे. पक्षाला गालबोट लावाल, बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना दम भरला.

खासदार सुळे सध्या औरंगाबाद  दौऱ्यावर असून पैठणमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी आमदार संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. वाकचौरे यांचे विधानसभेचे तिकिट कापल्यापासूनच पैठण राष्ट्रवादीमध्ये वाकचौरे आणि गोर्डे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर सुळे यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याचे पाहून त्या प्रचंड संतापल्या. माझ्या बापाने रक्ताचे पाणी करून हा पक्ष वाढवला आहे. ही हुल्लडबाजी मी खपवून घेणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे, हे समजून घ्या. माझ्या कार्यक्रमात पहिल्यांदाच असा गोंधळ होत आहे. हे मी खपवून घेणार नाही, असा दम सुळे यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना भरला. वाकचौरे गटाने मात्र सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ झालाच नसल्याचा दावा केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा