औरंगाबादच्या ऑरिक सिटीत ‘ट्रान्सफार्मर क्लस्टर’, रशियन कंपनी करणार 5 हजार कोटींची गुंतवणूक

0
218

औरंगाबाद: दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या ऑरिक सिटी प्रकल्पाअंतर्गत शेंद्रा-बिडकीन मेगापार्कमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. बिडकीन येथे पोलादपासून स्टील तयार करुन आधुनिक तंत्राद्वारे इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर तयार करणारी एनएलएमके ग्रुप या रशियन कंपनीने 5 हजार कोटीच्या गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. याअंतर्गत ट्रान्सफार्मर तयार करणारे 20 कारखाने उभारले जाणार आहेत. त्यामुळे वाळूज येथील ऑटो क्लस्टरप्रमाणे ऑरिक सिटीत ट्रान्सफार्मर क्लस्टर तयार केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

 राज्य नियोजन समितीच्या बैठकीसाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई हे गुरुवारी औरंगाबादेत आले होते. देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमवेत ऑरिक सिटीच्या कार्यालय आणि डीएमआयसीच्या कामांची पाहणी केली. डीएमआयसीमध्ये उद्योग उभारण्यास उद्योजक इच्छूक आहेत. अनेक मोठ्या उद्योजकांनी या ठिकाणी येवून जागेची पाहणीही केली आहे. रशियामध्ये पोलादापासून स्टील तयार करणारी एनएलएमके ग्रुप ही कंपनी डीएमआयसीच्या बिडकीन पार्कमध्ये 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी स्टीलपासून अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर तयार करते. स्टीलपासून इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर बनवणारा देशातील हा पहिला कारखाना औरंगाबादेत होणार आहे. या कंपनीमुळे 2 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. इतर राज्यात ट्रान्सफार्मर तयार करणार्‍या सुमारे 20 कंपन्यांनीही या ठिकाणी येण्याची तयारी दशर्वली आहे. त्यामुळे येथे ट्रान्सफार्मर क्लस्टर तयार होणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.

मनुष्यबळ येथूनच तयार करा-उपमुख्यमंत्री: ऑरिकमध्ये येणार्‍या कंपन्यांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळही येथे निर्माण करण्यावर भर द्यावा. त्यातून बेरोजगार तरुणांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केली. यावेळी ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मुंढे, कैलास जाधव, सह व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा