सर्वसामान्यांना एक आणि नेत्यांना दुसरा न्याय कसा?: सीडीआरवरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले

0
220
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सीडीआरच्या ( कॉल रेकॉर्ड डिटेल्स) आधारे गंभीर आरोप करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्याच सीडीआरवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काँग्रेसने फडणवीसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे, असे म्हटले आहे.

 देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआरची माहिती तपास यंत्रणांना द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सीडीआर मिळवणे गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सीडीआर रॅकेट उघडकीस आणले होते, असे सांगत सीडीआर मिळवून फडणवीसांनीच गुन्हा केल्याचा अप्रत्यक्ष आरोपही सावंत यांनी केला आहे. त्यासाठी सावंत यांनी काही बातम्यांची कात्रणेही ट्विट केली आहेत.

नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वासामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार कतील हा विश्वास आहे आणि विनंतीही आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा