सचिन वाझे म्हणतात, आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ जवळ येत चालली आहे…

0
1462

मुंबईः मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई पोलिस दलातील सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवत आहेत… आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ जवळ येत चालली आहे असे वाटू लागले आहे, असे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता दिसू लागली आहे. दरम्यान, वाझे यांना अटकेची भीती असून त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

३ मार्च २००४ रोजी सीआयडीमधील माझ्या काही सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली होती. ती अटक आजपर्यंत अनिर्णित आहे. आता इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा वास येऊ लागला आहे. माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थिती थोडासा फरक आहे, असे वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेट्समध्ये म्हटले आहे.

सचिन वाझे आपल्या व्हॉट्सअप स्टेट्समध्ये पुढे म्हणतात की, तेव्हा माझ्याकडे आशा, संयम, जीव आणि नोकरीची १७ वर्षे होती. आता माझ्याकडे जगण्यासाठी भविष्यातील जीवनाची १७ वर्षे नाहीत, नोकरी नाही आणि संयमही नाही. जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे, असे वाटते, असेही वाझे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेट्समध्ये म्हटले असून थेट मृत्यूचा विचार बोलून दाखवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अटकेची भीतीः मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदलीही करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला. एटीएसने वाझे यांचा जबाबही नोंदवून घेतला. या प्रकरणात वाझे यांना अटकेची भीती वाटत असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा