पालघर प्रकरणी आकांडतांडव करणारा भाजप बुलंदशहरातील साधूंच्या हत्येप्रकरणी चिडीचूप का?

2
273
उत्तर प्रदेशचे 'भगवाधारी' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जेथे दोन साधूंची हत्या झाली ते ठिकाण.

नवी दिल्ली/ मुंबईः महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंची हत्या होऊन आठवडा उलटला नाही तोच भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंगळवारी दोन साधूंची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालघर जिल्ह्यातील प्रकरणावरून सोशल मीडियावर प्रचंड आकांडतांडव करण्यात आले. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर अक्षरशः या प्रकरणी पोस्टचा महापूर वहिला. पालघर जिल्ह्यात घडलेला प्रकार म्हणजे समस्त हिंदूंवर झालेला कुठाराघात असल्याचे भासवत झटक्यात या प्रकरणाला धार्मिक आणि जातीय रंगही देण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांपासून ते जिल्हास्तरावरील नेत्यांनी पालघर प्रकरण डोक्यावर घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला धारेवर धरले होते, परंतु तेच भाजपचे नेते आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात घडलेल्या दोन हिंदू साधूंच्या हत्येप्रकरणी चिडीचूप आहेत.

पालघर प्रकरणी काही वृत्तवाहिन्यांनीही प्रचंड आक्रस्ताळी भूमिका घेत देशात भगवी वस्त्रे घालणे आणि हिंदू असणे जणू काही गुन्हाच झाला असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येत एकाही मुस्लिमाचा हात नाही, असे सांगत महाराष्ट्राचे गृहमंत्री अटक केलेल्या सर्वच्या सर्व आरोपींची यादीच सार्वजनिक करून या प्रकरणाला धार्मिक रंग देणाऱ्यांच्या फुग्यातली हवाच काढून घेतली तर या प्रकरणाला जातीय वळण द्याल तर सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कैचीत पकडण्याची हीच संधी आहे, असे समजून उत्तर प्रदेशचे ‘संन्यासी’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ठाकरेंना फोन करून साधूंच्या हत्येप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून या हत्याप्रकरणाचा अहवाल मागवला. भाजपचे नेते,केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यपातळीवरील नेते यांनी पालघर प्रकरणी ट्विटचा भडीमार करत ठाकरे सरकारवर टिकेची तोफ डागली. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि भाजप नेते आणि त्यांच्या ट्रोल आर्मीचा जणू अवसान घातच झाला.

पालघर प्रकरणी तातडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणी राज्य सरकारला कठोर कारवाईचे निर्देश देण्याची मागणी करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पालघर प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या संतांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र याच दिवशी बुलंदशहरात हत्या झालेल्या दोन साधूंना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही.

पालघर प्रकरणी धडाधड ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार करणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्र यांनीही बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येबद्दल चकार शब्दही काढला नाही. पालघर प्रकरणी संतांचा मृत्यू झाला आहे, संतांना कोण विचारतो? असा त्रागा करणाऱ्या संबित पात्रा यांनी मंगळवारच्या बुलंदशहरातील साधूंच्या हत्येवर बोलणे तर सोडाच परंतु त्यांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही. उलट त्यांनी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सवाल केले आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना फोन करून हिशेब चुकता केला. बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त करतानाच आम्ही केली त्याप्रमाणे दोषींविरुद्ध कठोर कारवाई करा आणि या घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असा जोरदार टोला लगावत योगींनी केलेल्या फोनची फिट्टमफाट करून घेतली. दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियकां गांधी यांनीही बुलंदशहर प्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये, असे सांगतानाच वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, याची आठवणही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून दिली आहे.

आत पालघर आणि बुलंदशहरमध्ये हत्या झालेले साधू हिंदूच होते, परंतु पालघर प्रकरणी आकांडतांडव करणाऱ्या भाजपला बुलंदशहरात झालेल्या दोन साधूंच्या हत्येबद्दल थोडेही दुःख वाटत नाही का? हिंदू साधूंचाही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच भाजप वापर करून घेऊ इच्छिते? असे सवाल सोशल मीडियातून भाजपला विचारले जाऊ लागले आहेत.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा