गर्दीचे सगळेच कार्यक्रम जोरात, मग शिवजयंती कार्यक्रमांवरच बंदी का?: संभाजी ब्रिगेडचा सवाल

0
240
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करतानाच राज्य सरकारने मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर बंदी घातली असून राज्य सरकारच्या या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे. सर्वच गर्दीचे कार्यक्रम धुमधडाक्यात सुरू असताना शिवजयंतीच्या कार्यक्रमांवरच बंदी का? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी आहे. महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमी सरकारचे सर्व नियम पाळून धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. मात्र कोरोनाचे कारण देऊन यावर्षी ‘शिवजयंती’ कार्यक्रम रद्द करण्यात निर्णय घेतला असून तसा औरंगजेबी ‘फतवा’ सरकारने काढला आहे. या फतव्याचा व ठाकरे सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे भानुसे यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचे स्वागत हजारो लोकांची उपस्थिती होती. नागपुरात नाना पटोलेंचे स्वागत हजारो लोकांच्या उपस्थितीत झाले. वडेट्टिवारांचे मोर्चे व सभांनाही हजारो लोकांची उपस्थिती होती. पोलिस त्यांना परवानगी देतात. शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगालसह देशभर फिरत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. काँग्रेस व शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री महाराष्ट्रभर हजारो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात पोलिस त्यांना परवानगी देतात आणि सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी घातली जाते, हे निषेधार्ह आहे, असे भानुसे यांनी म्हटले आहे.

पदवीधर,शिक्षक व ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोरात झाल्या मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा या कार्यक्रमावर महाराष्ट्रचे सरकार जर बंदी घालत असेल तर ते निषेधार्ह आहे. सरकारने काढलेला फतवा तत्काळ मागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसगट परवानगी द्यावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने काढलेल्या या फतव्याच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तत्काळ बंदी उठून परवानगी द्यावी, असे डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद घालणाऱ्या शिवजयंतीचे महत्व काय कळणार…! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचे कार्यक्रम अतिशय दिमाखात, चांगल्या पद्धतीने घेणाऱ्या शिवप्रेमींच्या मनाच्या विरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याची यांची जर नियत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे हे यांच्या निर्णयावरून स्पष्ट होते. सरकारने तत्काळ निर्णय मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे, असे भानुसे म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा