सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांतूनच होणार, विधेयक विधानसभेत मंजूर

0
8386
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः थेट जनतेतून ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याची तरतूद असलेले विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाल्यामुळे मार्चमध्ये होऊ घातलेल्या राज्यातील दीडहजाराहून अधिक गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमधूनच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा तत्कालीन फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला होता. मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्यासंबंधीचा अध्यादेश काढण्याची विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली होती. मात्र या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राज्यपालांनी विधिमंडळात विधेयक मंजूर करून कायदा करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसते, अशा असंख्य तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यपालांच्या नकारानंतर महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत सदस्यांतूनच सरपंच निवडीची तरतूद असलेले विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवले आणि आवाजी मतदानाने ते मंजूरही झाले. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा