रोषाची भीती : निवडणूक आयोगाने टाळली सातारा लोकसभेची पोटनिवडणूक

1
859

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करताना 18 राज्यातील लोकसभेच्या 64 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला. मात्र या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यामुळे सातारा लोकसभेची जागा रिक्त आहे. परंतु उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे साताऱ्याच्या मतदारांचा प्रचंड रोष असून या रोषामुळे विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक घेतल्यास या पोटनिवडणुकीबरोबरच सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातही भाजपला जोरदार फटका बसू शकतो, अशी भीती असल्यामुळेच ही पोटनिवडणूक टाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघ एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. उर्वरित 2 काँग्रेसकडे तर 1 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडून सातारा जिल्ह्यात पायरोव करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पक्षात घेतले. या दोघांचाही राजकीय फायदा उचलून सातारा जिल्ह्यात पाळेमुळे घट्ट रोवण्याची भाजपची योजना होती. परंतु या दोघांच्याही भाजप प्रवेशामुळे जनमत अनुकुल होण्याऐवजी ते विरोधातच गेल्याचे सध्याचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेले या पुढच्या निवडणुकीत निवडून येणार नाहीत, अशी ‘व्यवस्था’ केल्याचे सांगत मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे 1999 आणि 2004 मध्ये झालेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंचाच पराभव केला होता. या दोन्ही निवडणुकांत उदयनराजे भाजपचे उमेदवार होते.

 दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे यांच्यात विस्तव आडवा जात नसतानाच शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशाविरोधात भाजपमध्ये विरोधाचा मोठा सूर उमटू लागला आहे. भाजपचे नेते दीपक पवार यांनी ‘शिवेंद्र हटाव, भाजप बचाव’ असा नारा दिला आहे. भाजपच्या 288 बूथ प्रमुखांनी दीपक पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात शिवेंद्रराजेंचे काम करायचे नाही, अशी शपथच घेतली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकदीनिशी सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखण्याचा जोरकस प्रयत्न करणार आहे, तर दुसरीकडे पक्षांतर्गंत विरोधाचा सूर आणि मतदारांचा रोष अशा तिहेरी संकटांमुळे विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक टाळण्यात आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

निवडूक आयोगाने उदयनराजेंच्या राजकीय सोयीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक टाळली, असा आरोप करत विरोधकांकडून निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही घेण्यात आली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते. विधानसभा निवडणुकीला लागणार्‍या यंत्रणेतच ही पोटनिवडणूकही पार पाडता आली असती. आता या लोकसभा मतदारसंघाची स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्यासाठी सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडणार आहे.उदयनराजेंच्या राजकीय सोयीसाठी भाजपने हा एकप्रकारे केलेला सत्तेचा दुरुपयोग मानला जाऊ लागला आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा