आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या संस्थेत मागासवर्गीस मुख्याध्यापकास सहा सवर्ण शिक्षकांकडून मारहाण

0
353

जालनाः सध्या देशात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयाचे मागासवर्गीय मुख्याध्यापक भाऊ सुज्ञान निर्मळ यांना सहा शिक्षकांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात त्या मारकुट्या सहा शिक्षकांविरूद्ध मारहाणीच्या कलमासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजातील भाऊ सुज्ञान निर्मळ (वय ४८, रा. नागझरी) हे राजेश टोपे यांच्या शिक्षण संस्थेतील विद्यालयात बऱ्याच वर्षांपासून मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. ते मागासवर्गीय असूनही मुख्याध्यापकपदावर असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे या विद्यालयात कार्यरत सवर्ण शिक्षक-कर्मचाऱ्यांना कमीपणा वाटत असल्याने त्यांनी निर्मळ यांना संबंधितांकडून वेळोवेळी त्रास झाल्याने त्यांनी माहेर भायगाव येथून हस्तपोखरी येथे बदली करून घेतली होती. सध्या ते मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात गेल्या तीन वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून काम पहात आहेत. या शाळेवर एकूण १२ कर्मचारी आहेत.

२५ जून रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक निर्मळ यांनी शाळेत जाऊन कार्यालयीन काम सुरु केले. त्यांनी सर्व शिक्षक- कर्मचाऱ्यांच्या हजेरी मस्टरवर सह्या घेतल्या आणि राष्ट्रीय थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आराखडा रजिस्टर तयार केल्यानंतर तू जास्त हुशार आहेस का? अति शहाणपणा करू नको? असे म्हणून शाळेतील शिक्षक आर.टी.कंटुले, एस.एम.गव्हाणे, एस.बी.कोळकर, आर.एस.मोरे, आर.एस.जिगे, व एन.यू.खरात या सहा शिक्षकांनी मिळून त्यांच्या डोक्यात व पाठीत काठ्यांनी मारहाण करून डोके फोडले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकाराने घाबरून मुख्याध्यापक निर्मळ यांनी आपला जीव वाचवून हस्तपोखरी येथून एका मोटरसायकलवरून अंबड पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. निर्मळ यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी शिक्षक कंटुले, गव्हाणे, कोळकर, मोरे, जिगे व खरात या सहा जणांविरुद्ध भादंवि कलम १४३ , १४७, १४८, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या दोन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया यांचेकडून उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी. शेवगण यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा