शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावरही ‘स्वाधार’चा लाभ!

0
123
संग्रहिित छायाचित्र.

मुंबई: शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११ वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापुरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे शहरापासून ५ किलो मीटर हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, ही मर्यादा आता १० किमीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचेही मुंडे म्हणाले. मंत्रालयात बुधवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या संदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

११ वी,१२ वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगरव्यवसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र परंतु प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरांमध्ये वार्षिक रु. ६० हजार, इतर महसुली विभाग, क वर्ग महानगरपालिका आदी ठिकाणी वार्षिक रु. ५१ हजार, तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी वार्षिक रु. ४३ हजार इतकी रक्कम या योजनेअंतर्गत देण्यात येते.

ही योजना लागू असलेल्या शहर किंवा महानगरपालिकेपासून ५ किमीहद्दीपर्यंत असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकत होता. या अंतराची मर्यादाही आता १० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयानुसार मोठी शहरे, महानगरपालिका तसेच जिल्हा स्तरावरुन आता तालुका स्तरावर विविध महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा